मुंबई
bagulbua आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांत वेगाने वाढत असताना, आता मराठी चित्रपटसृष्टीतही या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक अभिनव प्रयोग साकारण्यात आला आहे. एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला ‘बागुलबुवा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष कलाकारांना घेऊन एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अशा पद्धतीने तयार होऊन चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या तांत्रिक वाटचालीतील हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे.
एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक चेतन चावडा यांनी चित्रपटाची कथा लिहिण्यासोबतच दिग्दर्शनही केले आहे. नितिन चव्हाण यांनी पटकथा लेखन, विनोद राजे यांनी संकलन, अथर्व चव्हाण यांनी व्हीएफएक्स, तर आकाश पांडे यांनी स्टोरीबोर्डची जबाबदारी पार पाडली आहे. चित्रपटातील एआयशी संबंधित तांत्रिक काम मेटाफेक्स प्रोडक्शनने केले आहे. आदिती द्रविड यांच्या गीतांना साई पियूष यांनी संगीत दिले आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, अन्य ५५ कलाकारांची नावे निर्मात्यांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत.
‘बागुलबुवा’चे टायटल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हॉलिवूडमधील भव्य चित्रपटांची आठवण करून देणारी दृश्यरचना आणि प्रभावी तांत्रिक मांडणी हे या टीझरचे वैशिष्ट्य ठरत आहे. चित्रपटाचे कथानक पुणे आणि आसपासच्या परिसरात घडत असल्याचे टीझरमधून सूचित होते. अचानक उद्भवणारे एक अनाकलनीय संकट आणि त्याकडे पाहिल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होण्याची विचित्र परिस्थिती, अशी गूढ पार्श्वभूमी त्यात दिसते. या संकटामागील ‘बागुलबुवा’ नेमका कोण किंवा काय आहे, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. या रहस्याचा उलगडा चित्रपटातूनच होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी चित्रपटांच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये यापूर्वी क्वचितच पाहायला मिळालेल्या भव्य दृश्यात्मकतेमुळे या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.
काळानुसार बदलणारे bagulbua तंत्रज्ञान स्वीकारत मराठी चित्रपटसृष्टीने आपला प्रवास सुरू ठेवला आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून चित्रपटांची दृश्यात्मक भव्यता आणि निर्मितीची व्याप्ती वाढवता येऊ शकते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न ‘बागुलबुवा’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. संपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीत एआयचा वापर हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य असले, तरी चित्रपटात आणखी काही अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या अतिरिक्त वैशिष्ट्यांबाबत निर्मात्यांनी सध्या मौन बाळगले असून, त्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याचे संकेत देणाऱ्या या चित्रपटामुळे मराठी सिनेमातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.