सावली,
tiger-finally-captured सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड (खुर्द) उपवनक्षेत्रांतर्गत येणार्या सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी परिसरात मागील महिनाभरापासून धुमाकूळ घालणारा आणि तीन गुराख्यांचा बळी घेणारा टी-122 वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. या वाघाला पकडण्यासाठी गर्वाला जंगल परिसरात मागील चारपाच दिवसांपूर्वी लावलेल्या 30 बाय 30 फूट आकाराच्या हायटेक पिंजर्यात शनिवार, 24 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास तो अडकला. वाघ जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने 27 सप्टेंबर 2026 पासून या वाघाला पकडण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली होती. वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या नेतृत्वात आणि विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी . घनश्याम नायगमकर आणि ब्रम्हपुरी वनविभागाचे जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांच्या संकल्पनेतून 30 बाय 30 फूट आकाराचा विशेष पिंजरा तयार करण्यात आला. हा पिंजरा सावली परिक्षेत्रातील सिर्सी, उपरी, सामदा वन बीटात बसवण्यात आला होता. त्यावर 24 तास नजर ठेवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यात 9 सिसिटिव्ही गरुडा कॅमेरे, 20 टॅप कॅमेरे, 3 लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले. या मोहिमेत 60 वनकर्मचारी व वनमजुर वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
ही मोहीम सहायक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली राबविण्यात आली होती. या मोहिमेत वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर, जीवशास्त्रज्ञ नारनवरे, क्षेत्र सहायक मारुती पुल्लेवार, शुटर प्रदीप कोडापे तसेच सामदा, उपरी, नवेगाव, सिर्सी, चारगाव येथील वनरक्षक आणि आरआरयु पथक चंद्रपूर, पिआरटी चमू, एसटीपीएफ चंद्रपूर आणि स्थानिक वनमजुर सहभागी होते.