मौजे गोद्रीत चक्क वाघाची अफवा!

गोद्री परिसरात झाडावर आढळले बिबट्याच्या नखांचे निशाण

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
बुलडाणा,
chikhali tiger romoursचिखली तालुक्यातील मौजे गोद्री परिसरातील शेतात वाघ आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली होती. या माहितीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व रेस्क्यू टीमने शुक्रवारी रात्री तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर 'सर्च ऑपरेशन' सुरू केले. या सखोल पाहणीत वाघ असल्याच्या कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळल्या नाहीत. विशेष म्हणजे, शुक्रवारी रात्री व शनिवारी राबवण्यात आलेल्या या सर्च ऑपरेशन दरम्यान गोद्री येथे बिबट्याचे झाडाच्या खोडावर नखांनी ओरबाडून झालेले निशाण आढळून आले तसेच बिबट्याची विष्टा आढळून आली आहे. त्यामुळे वाघ असल्याची माहिती पूर्णपणे निराधार व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
ti
बुलढाणा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुम्मी वर्तुळ अधिकारी तथा वनपाल बकाल, वनरक्षक वायाळ, गायके, ए. जी. शिंदे, नितेश गवई, जी. आर. शिंदे आणि रेस्क्यू टीमचे संदीप मडावी, अमोल चव्हाण यांनी रात्री आणि दिवसा हे सर्च ऑपरेशन राबवले.या संदर्भात वनविभागाने गोद्री गावात दवंडी देऊन जनजागृती केली दरम्यान, शनिवारी सकाळी वनविभागाकडून पुढील पाहणी सुरू असताना साकेगाव, वाघापूर आणि माळशेंबा या परिसरामध्ये मात्र बिबट्याचे पाऊलठसे स्पष्टपणे आढळून आले आहेत. यावरून या संपूर्ण परिसरात वाघ नसून बिबट्याचाच वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 

cv
 
 
काही नागरिकांकडून सोशल मीडियावर एआय जनरेटेड वाघाचे खोटे फोटो टाकून जाणीवपूर्वक दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा खोट्या बातम्या व फोटो कोणीही फॉरवर्ड करू नयेत. वाघ आल्याची निव्वळ अफवा असून, यापुढे अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर व योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे. वनविभागाने दिलेल्या सुचनेनुसार सर्व गावकऱ्यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी व बंदिस्त जागेत बांधावीत, त्यांना रात्रीच्या वेळी उघड्यावर सोडू नये.
 
शेतकऱ्यांनी सोबत जावे: शेतातील कामे करताना एकट्याने जाणे टाळावे. शेतात जाताना किंवा येताना किमान चार-दोन शेतकऱ्यांनी एकत्र सोबत जावे.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडून घाबरून जाऊ नये. फॉरेस्ट टीमकडून परिसराची सतत पाहणी केली जात असून वन्यप्राण्याला लवकरच जेरबंद केले जाईल. तोपर्यंत सर्वांनी सतर्क राहून स्वतःची व जनावरांची काळजी घ्यावी. वाघ किंवा बिबट्या संदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा खात्रीशीर माहिती आढळल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.