कपड्यांमध्ये लपवले १.५६ कोटींचे परकीय चलन

मलेशियाला जाणाऱ्या दोघांना अटक

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
हैदराबाद,
Foreign currency worth 1.56 crore हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे १.५६ कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन जप्त केले आहे. मलेशियातील क्वालालंपूर येथे जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन प्रवाशांकडून हे चलन हस्तगत करण्यात आले. २२ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, त्याची माहिती शनिवारी देण्यात आली. एअरएशियाच्या AK-68 या विमानातून प्रवास करणाऱ्या या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या हैदराबाद विभागीय पथकाने सर्वप्रथम एका पुरुष प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याच्या केबिन बॅगेची तपासणी केली असता कपड्यांमध्ये काळ्या प्लास्टिकच्या आवरणात लपवलेले ६६,६०० अमेरिकी डॉलर, ३,७७३ मलेशियन रिंगिट आणि २ सिंगापूर डॉलर आढळले. या चलनाचे एकूण मूल्य सुमारे ६३.६२ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 
chalan
 
चौकशीदरम्यान संबंधित पुरुष प्रवाशाने त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडेही परकीय चलन असल्याची माहिती दिली. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेलाही ताब्यात घेऊन तिच्या केबिन बॅगेची तपासणी केली. तिच्याकडून ९७,६०० अमेरिकी डॉलर जप्त करण्यात आले. या डॉलरचे मूल्य सुमारे ९१.९४ लाख रुपये आहे. हे चलनही ट्रॉली बॅगेत कपड्यांमध्ये अशाच प्रकारे लपवून ठेवण्यात आले होते. अशा प्रकारे दोन्ही प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या परकीय चलनाची एकूण किंमत सुमारे १.५६ कोटी रुपये आहे. या चलनाची कायदेशीररीत्या खरेदी केल्याचे किंवा ते परदेशात घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे दोन्ही प्रवासी सादर करू शकले नाहीत. त्यामुळे सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत डीआरआयने संपूर्ण परकीय चलनासह ते लपवण्यासाठी वापरलेल्या ट्रॉली बॅगही जप्त केल्या आहेत.
 
 
या प्रकरणातील दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या नावांचा खुलासा डीआरआयने केलेला नाही. जप्त केलेले परकीय चलन नेमके कुठून आणले होते, ते मलेशियाला कोणत्या उद्देशाने नेले जात होते आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी डीआरआयने मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. त्या कारवाईत १०.४८ कोटी रुपये मूल्याचे मौल्यवान धातू, रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.