नवी दिल्ली
gangster himanshu bhau दिल्ली आणि हरियाणातील पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेला कुख्यात गँगस्टर हिमांशू भाऊ याला अमेरिकेत फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) अटक केली आहे. हत्या, अपहरण आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे आरोप असून, त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. त्याला लवकरच भारतात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. हिमांशू भाऊचे नाव अभिनेता आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेशीही जोडले गेले आहे. या गोळीबाराची जबाबदारी त्याने स्वीकारली होती, असे वृत्त आहे. गुजरातमधील उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहात बंदिस्त असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीशी हिमांशू भाऊचे जुने वैर आहे. तो सातत्याने बिश्नोई टोळीच्या विरोधात राहिला आहे.
हिमांशू भाऊ याला त्याच्या मूळ गावी हिमांशू ऊर्फ भाऊ रिटोलिया या नावानेही ओळखले जाते. तो हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रिटोली गावचा रहिवासी आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्याचा जन्म २००२ मध्ये झाला असून, अवघ्या १७व्या वर्षी त्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. २०२० मध्ये हिसार येथील बालसुधारगृहातून तो अन्य २० मुलांसह फरार झाला होता. त्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा विस्तार वाढत गेला. हरियाणा आणि दिल्ली पोलिसांच्या शोधयादीत त्याचा समावेश झाला. दिल्ली, हरियाणा तसेच उत्तर प्रदेशात त्याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्या, अपहरण आणि जबरदस्तीने खंडणी वसूल करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हिमांशू भाऊची टोळी दिल्ली आणि हरियाणात दीर्घकाळापासून सक्रिय असल्याचे सांगितले जाते. गुन्हेगारी कारवायांनंतर तो पोर्तुगालमार्गे अमेरिकेत पोहोचला आणि तेथूनच टोळीचे कामकाज चालवत असल्याची माहिती आहे. त्याचे नीरज बवाना टोळीशी जवळचे संबंध असल्याचेही समोर आले आहे. एल्विश यादवच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी त्याचा शोध अधिक तीव्र केला होता. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याच्याविरोधात कारवाईसाठी प्रयत्न सुरू होते.
गेल्या वर्षभरापासून हिमांशू भाऊची टोळी दिल्ली परिसरात विशेष सक्रिय असल्याचे वृत्त आहे. त्याच्या साथीदारांनी मागील सहा महिन्यांत अनेक मोठ्या गुन्ह्यांना अंजाम दिल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेकडे दिल्ली आणि हरियाणा पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेत अटक झाल्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता असून, त्याच्या भारतातील कथित गुन्हेगारी कारवायांबाबत पुढील तपासात अधिक माहिती स्पष्ट होऊ शकते.