नवी दिल्ली,
india-fake-medicines-quality-testकेंद्रीय औषध प्रयोगशाळांना विविध कंपन्यांनी तयार केलेल्या औषधांचे ३३० नमुने गुणवत्ता मानकांशी सुसंगत नसल्याचे आढळले आहे. बड्या औषध कंपन्यांच्या नावावर बनावट औषधींची विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनातून दिली आहे. सप्टेंबरमध्ये ३३० नमुने मानकांची पूर्तता करू शकले नाहीत असे त्यात नमूद करण्यात आले.
दिल्लीतील तपासणीत दुसऱ्या कंपनीच्या ब्रँडच्या नावाने तयार केलेले एक बनावट औषधही आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या औषध सतर्कता अहवालात म्हटले की, केंद्रीय औषध प्रयोगशाळांना विविध कंपन्यांनी तयार केलेल्या औषधींचे ४२ नमुने गुणवत्ता मानकांशी सुसंगत नसल्याचे आढळले आहे. याव्यतिरिक्त, राज्य औषध चाचणी प्रयोगशाळांनाही औषधांचे २८८ नमुने मानकांशी सुसंगत नसल्याचे आढळले.
औषधी गुणवत्ता मानकांत नापास झालेल्या औषधींची एकूण संख्या ३३० आहेत. नियमित नियामक देखरेख उपक्रमांचा एक भाग म्हणून, मानकांशी सुसंगत नसलेल्या आणि बनावट औषधांची यादी दरमहा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते. जर औषधीचा नमुना एक किंवा अधिक स्थापित गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नसेल, तर तो सुसंगत नसलेला मानला जातो. ही कमतरता सरकारी प्रयोगशाळेने तपासलेल्या औषधीच्या विशिष्ट बॅचपुरती मर्यादित असते. याचा अर्थ असा नाही की बाजारात उपलब्ध असलेल्या इतर औषधांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह आहे. ज्या कंपन्यांची औषधी गुणवत्तेची पूर्तता करण्यात अपयशी ठरली त्यांची चौकशी सुरू करण्यात आली.
कायदा आणि नियमांनुसार कारवाई
दिल्लीतील एक औषधाचा नमुना बनावट असल्याचे आढळले. हे अनधिकृत उत्पादकांनी तयार केले होते, ज्यांनी दुसऱ्या कंपनीच्या मालकीच्या ब्रँडचा वापर केला होता. मंत्रालयाने म्हटले की या प्रकरणाची चौकशी सुरू असून कायदा आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल. निकृष्ट दर्जाची आणि बनावट औषधे ओळखण्यासाठी नियमित कारवाई केली जाते. ही कारवाई राज्य नियामकांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. अशी औषधे ओळखून बाजारातून काढून टाकणे हा यामागील उद्देश आहे.
सरकारकडून समिती स्थापन
औषध कंपन्यांच्या विपणनाशी संबंधित अनैतिक प्रथांना आळा घालण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. औषधनिर्माण विभागाने ही समिती स्थापन केली आहे. ही समिती औषध विपणनाशी संबंधित विद्यमान नियमांचा आढावा घेईल आणि या क्षेत्रातील अनैतिक प्रथांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवेल. समितीचे अध्यक्षपद नीती आयोगाचे सदस्य एम. श्रीनिवास भूषवतील. माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि मेदांताचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) नरेश त्रेहान हे तिचे सदस्य असतील.