नवी दिल्ली,
India's victory in Christchurch भारतीय संघाने ख्राईस्टचर्च येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला आहे. शनिवारी (24 October) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. एक वेळ अशी होती की यजमान न्यूझीलंड संघ सहज जिंकेल असे वाटत होते, कारण भारताला शेवटच्या 3 षटकांत 46 धावांची गरज होती आणि 6 फलंदाज बाद झाले होते. मात्र, तिलक वर्मा आणि नितीश रेड्डी यांनी 7 व्या विकेटसाठी अवघ्या 30 चेंडूत नाबाद 69 धावांची वादळी भागीदारी करत भारताला हारलेला सामना जिंकवून दिला.या विजयासह भारतीय संघाने मालिकेमध्ये 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. संजू सॅमसन (14), वैभव सूर्यवंशी (04), कर्णधार श्रेयस अय्यर (07) आणि अभिषेक शर्मा (27) हे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. अवघ्या 70 धावांवर 5 विकेट्स गमावल्यामुळे भारताचा पराभव निश्चित मानला जात होता. परंतु, तिलक आणि नितीश यांनी सामना पूर्णपणे फिरवला.
तिलक आणि नितीशची धडाकेबाज फलंदाजी
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने अवघ्या 26 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर क्रमांक 7 वर आलेल्या नितीश रेड्डीने 13 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 26 धावा कुटल्या. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला.
न्यूझीलंडचे 180 धावांचे आव्हान
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 43 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांसह सर्वाधिक 70 धावांची खेळी केली, तर बेव्हॉन जॅकोब्सने 58 धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने 2 बळी घेतले. 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने19.5 षटकांत 6 गडी गमावून विजय मिळवला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक 4 बळी घेतले. मात्र, मोक्याच्या क्षणी तिलक वर्मा आणि नितीश रेड्डी यांच्यातील भागीदारीने न्यूझीलंडच्या हातातून विजय हिसकावून घेतला.