KBCत लाखोंची कमाई, तरी दुष्काळापुढे हतबल!

मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
मुंबई,
KBC Drought Storyकेबीसीमध्ये गड्याने 50 लाख रुपये जिंकले पण दुष्काळासमोर मात्र हा शेतकरी हरला. कापसाला बोंडं नाहीत, सोयाबीनला दाणे नाहीत, विहीर खोदली, पण पाणी नाही. शेतीत पैसा घातला, पण हातात काहीच उरलं नाही. पैठण तालुक्यातल्या गावतांडा गावचे कैलास कुंटेवार यांची ही कहाणी. पण ही केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नाही. तर, मराठवाड्यात आज असे कितीतरी शेतकरी आहेत, ज्यांची पिकं डोळ्यांदेखत करपली, ज्यांचा शेतीचा खर्च वाया गेला आणि ज्यांच्यासमोर आता कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न उभा आहे. केबीसीतून मिळालेल्या पैशांनी कैलास यांनी स्वप्नं पाहिली, पण दुष्काळानं त्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
 

dro 
 
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून कौन बनेगा करोडपती म्हणजेच केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकणारे पैठण तालुक्यातल्या गावतांडा गावचे शेतकरी कैलास कुंटेवार. अवघी दोन एकर शेती... कधी स्वतःच्या शेतात राबायचं, तर कधी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून घर चालवायचे. केबीसीत पैसे जिंकल्यानंतर आता आपले दिवस बदलतील, अशी आशा त्यांना वाटली. त्याच पैशातून शेतीत गुंतवणूक केली, विहीर खोदली पण विहिरीला पाणी लागलं नाही. कापसाची लागवड केली, पण बोंडं लागली नाहीत, यंदा सोयाबीनही हातचं गेलं. म्हणजे पैसा घालूनही पदरात काहीच पडलं नाही. ज्या शेतीतून कुटुंबाचं भविष्य घडवायचं होतं, त्याच शेतीनं आज कैलास यांना संकटात आणलंय. केबीसीमध्ये जिंकलेले पैसे शेतीत लावले, पण यंदाच्या दुष्काळानं, निसर्गाच्या मारानं कैलास यांचं सगळं गणितच बिघडून टाकलंय.
 
 
कैलास यांची ही अवस्था पाहिली, तर दुष्काळानं शेतकऱ्याला कुठं आणून ठेवलंय, याची कल्पना येते. पेरणीसाठी पैसा लागतो, बियाणं लागतं, खतं आणि औषधं लागतात. शेतकरी पदरमोड करून, कधी उसनवारी करून शेतात पीक उभं करतो. पण, पाऊस साथ देत नाही, पाण्याची सोय होत नाही आणि अख्खं पीक हातातून जातं. मग केलेला खर्च कसा भरून काढायचा? घरखर्च कसा भागवायचा? मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे? असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहतात. कैलास यांच्याकडे दोन एकर जमीन आहे, पण पाणी नसेल तर या जमिनीचा उपयोग तरी काय? विहीर असून पाणी नाही, मेहनत असून उत्पन्न नाही आणि पीक गेल्यानंतर पुढच्या हंगामाची तयारी करण्यासाठीही पैसा नाही. दुष्काळानं शेतकऱ्याची अवस्था अशी केलीय की, जगण्यासाठी शेती करायची की शेती वाचवण्यासाठी जगायचं, असा प्रश्न बळाराजाला पडतोय.