मुंबई
ATS मुंबईतील माहिम परिसरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक केली आहे. एटीएसच्या काळाचौकी युनिटने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून माहिम मेट्रो स्थानकाजवळील लक्ष्मी बिल्डिंग परिसरातून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, आरोपीच्या संपर्कांची आणि ऑनलाइन हालचालींची सखोल चौकशी सुरू आहे.
अटक करण्यात आलेला मोहम्मद हसन हा इत्र आणि अत्तर विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. तो बाईक रायडर असल्याचेही सांगितले जात आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप आढळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. याशिवाय, प्रक्षोभक पोस्ट आणि जिहादी विचारांचे समर्थन करणारे संदेशही त्याच्या मोबाईलमध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावरील हालचाली तपासाच्या केंद्रस्थानी
आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक विचारांचा प्रसार करत होता, असा संशय एटीएसला आहे. त्याने मुस्लिमांना शस्त्र हाती घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोस्ट केल्याचाही आरोप आहे. तसेच, तो टेलिग्राम ग्रुप चालवत असल्याचे आणि या ग्रुपवर मसूद अजहरच्या भाषणांचे ऑडिओ अपलोड केल्याचेही सांगितले जात आहे. या ऑनलाइन व्यवहारांमागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याATS मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटींविषयी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीवर आरोपीने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट, मोबाईलमधील सामग्री आणि संभाव्य संपर्कांची माहिती तपासली जात आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी त्याचा काही संबंध होता का, याचाही एटीएसकडून शोध घेतला जात आहे.या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्याशी संपर्कात असलेल्या इतर संशयित व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे. आरोपी दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता का, तसेच त्याच्या कथित ऑनलाइन प्रचारामागे आणखी कोणी कार्यरत होते का, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.माहिम परिसरातील या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले असून, आरोपीकडून होणाऱ्या चौकशीतून त्याचे संभाव्य संपर्क, ऑनलाइन नेटवर्क आणि कथित देशविघातक कारवायांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, या आरोपांची सत्यता आणि आरोपीच्या कथित दहशतवादी संबंधांबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासातूनच स्पष्ट होणार आहे.