अनिल कांबळे
नागपूर,
nagpur grape export fraud द्राक्षांचा मोठा माल पुरविण्याचे आमिष दाखवून नागपुरातील खाद्यपदार्थ निर्यातदाराची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. मुंबईतील एका दलालाने नामांकित कंपनीचा मालक असल्याचे भासवून व्यवहारासाठी लाखो रुपये घेतले. मात्र, ठरलेल्या वेळेत माल न पाठविता टाळाटाळ केली. त्यानंतर दिलेला धनादेशही वटला नाही. अखेर आरोपीचा शोध घेऊनही तो सापडत नसल्याने प्रकरण पोलिसांत पोहोचले. लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र भैयाजी आडे (५७, रा. छापरू नगर चौक, सीए रोड) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांची बीजीपी एक्स्पोर्ट प्रा. लि. नावाची फर्म असून, या माध्यमातून ते परदेशात धान्य आणि अन्य खाद्यपदार्थांची निर्यात करतात.
काही दिवसांपूर्वी राजेंद्र आडे यांचा मुंबईतील वरळी परिसरात राहणाऱ्या प्रसन्न देशपांडे या दलालाशी संपर्क आला. देशपांडे याने आपण डीटी फ्लोअर कंपनीचा मालक असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात द्राक्षांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून आडे यांनी द्राक्षांची खरेदी, पॅकिंग आणि शीतगृहातील साठवणुकीच्या खर्चापोटी आरोपीच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे एकूण २३ लाख ६ हजार ६७२ रुपये जमा केले. मात्र, ठरलेल्या मुदतीत द्राक्षांचा माल मिळाला नाही. आडे यांनी विचारणा केली असता आरोपीने विविध कारणे सांगून टाळाटाळ केली. माल महाराज एंटरप्रायझेसकडे पाठविल्याचे सांगून तेथून पैसे मिळतील, असेही त्याने भासविले. त्यानंतर बालाजी ट्रेडिंग कंपनीच्या नावाने धनादेश दिला; मात्र तो बँकेत वटला नाही.
..........
कंपनी हवेतच
आडे यांनी पैशांसाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने आरटीजीएसद्वारे काही रक्कम परत केली. मात्र, उर्वरित २० लाख रुपये परत केले नाहीत. आडे यांनी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली; परंतु तीही परत आली. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन आरोपीच्या पत्त्यावर शोध घेतला असता देशपांडे किंवा त्याच्या कंपनीचा ठावठिकाणा लागला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आडे यांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी देशपांडेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.