नागपूर,
nagpur minor girl घराशेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने नुकताच बाळाला जन्म दिला. ही घटना उघडकीस येताच एमआयडीसी पोलिसांनी १६ वर्षीय प्रियकराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा एकमेकांच्या घरासमोर राहतात. दोघांचीही शेजारी म्हणून ओळख होती. दोघेही शाळकरी विद्यार्थी आहेत. जानेवारी २०२६ मध्ये आरोपीने पीडितेला प्रेमाचा प्रस्ताव दिला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे आणि भेटणे सुरू झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघेही शाळा सोडून एकमेकांसोबत फिरायला जात होते. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरोपीच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्याने मुलीला भेटण्यासाठी घरी बोलावले. दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेनंतर पीडिता गर्भवती झाली. अलीकडेच तिच्या पोटात दुखायला लागल्याने आईने तिला उपचारासाठी हिंगणा येथील शासकीय रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवले. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.