अनिल कांबळे
नागपूर
nagpur murder case इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावण्यावरुन शेजारी महिलेशी वाद झाला. महिलेने बडबड केली असता शेजारी राहणाऱ्या आरोपीने महिलेला चाकूने भोसकून ठार केले. या हत्याकांडात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एकनाथ ऊर्फ बंटी प्रेमराज टापरे (३५, रा. केडीके कॉलेज रोड, नंदनवन झोपडपट्टी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. चव्हाण यांनी हा निर्णय दिला.
नितीन गिरडकर आणि आरती गिरडकर या दाम्पत्याच्या शेजारी आरोपी बंटी टापरे राहत होता. २४ जून २०२० रोजी रात्री नऊ वाजता आरती गिरडकर या दुचाकी पार्किंग करीत होत्या. यादरम्यान बंटीसोबत वाद झाला. बंटीने खिशातून चाकू काढून आरतीवर सपासप वार करीत ठार केले. या प्रकरणी तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी तपास केला. आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपी बंटी टापरेला जन्मठेपेची शिक्षा दिली.
सराईत गुन्हेगारावर ३४ गुन्हे
आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध नंदनवन आणि सक्करदरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, दुखापत करणे, धमकी देणे, शस्त्र बाळगणे, जबरी चोरी आणि खंडणी मागणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ३४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) त्याची कारागृहात रवानगीही करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी केला. न्यायालयात सरकारी अभियोक्ता अॅड. सई खेडकर यांनी सरकारची बाजू मांडली, तर आरोपीतर्फे अॅड. आर. डी. गायकवाड यांनी काम पाहिले. न्यायालयीन पैरवी अधिकारी पोलिस हवालदार अलका ठेंगरे आणि पोलिस अमलदार अमोल कोठिया यांनी सहकार्य केले.