अनिल कांबळे
नागपूर
nagpur rape case विवाहित महिलेला मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी शारीरिक संबंध ठेवत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी ललित वंजारी (४२, रा. कळमेश्वर तालुका) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला हिंगणा परिसरातील रहिवासी आहे.
महिला पतीच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात मुलीसह माहेरी निघून आली होती. मुलीची तब्येत बिघडल्याने ती त्याला सावनेर येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेली. तेथे तिची आरोपी ललित वंजारी याच्याशी ओळख झाली. संभाषणादरम्यान महिलेने पतीसोबतच्या वादाची आणि कौटुंबिक त्रासाची माहिती त्याला दिली. त्यानंतर आरोपीने तिला विश्वासात घेऊन वर्धा रोडवरील डोंगरगाव येथे नेले. तेथे श्रीकांत या परिचिताच्या घरी भाड्याने खोली घेऊन तिची राहण्याची व्यवस्था केली. आरोपीने तिला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिला आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. ११ एप्रिल ते २२ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार सुरू होता. आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर हिंगणा पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.