भारत-न्यूझीलंड सामन्यावर ऑनलाइन सट्टा

मंगरूळनाथचा संशयित अटकेत

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
वाशीम,
online-betting-on-india-new-zealand-match भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालविणार्‍या रॅकेटचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दर्यापूर येथील मुख्य संशयितासह सट्टा अ‍ॅपची लिंक पुरविणार्‍या मंगरूळनाथ येथील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे वाशीम जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याने ऑनलाइन सट्ट्याच्या अवैध व्यवहारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
 
india-new-zealand-match
 
अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात ‘ऑपरेशन कवच’ मोहीम राबविण्यात येत आहे. याचदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दर्यापूर येथील कच्छीपुरा बनोसा परिसरातील शहबाज सलीम घानीवाले (वय २८) याच्या घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान शहबाज हा लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून ‘जय श्री राम’ नावाच्या सट्टा अ‍ॅपचा वापर करून ग्राहकांना लिंक पुरवत सट्टा स्वीकारत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी एक लॅपटॉप, दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.