खिशात साधा पेन ठेवण्यासही बंदी
तिरोडा,
tiroda-tehsil नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिरोडा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. अरुंद जागा, लांबच लांब रांगा, मंडपाचा अभाव, अपुरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि संथ मतदान प्रक्रियेमुळे उच्चशिक्षित मतदारांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. एवढेच नव्हे, तर मतदाराच्या खिशात साधा पेन असण्यावरही बंदी घालण्यात आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. तर लोकशाहीतील सुशिक्षित मतदारांसाठीच्या निवडणुकीतच मूलभूत सुविधांचा अभाव आणि नियमांच्या नावाखाली नाहक अडवणूक होत असेल, तर ही निवडणूक आहे की लोकशाहीची थट्टा, असा संतप्त सवाल मतदारांनी केला.
येथील मतदान केंद्रावर २ हजार २२७ मतदारांची नोंदणी होती. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होताच मतदारांची गर्दी वाढू लागली. मात्र, तहसील कार्यालयातील जागा अपुरी असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पुरुष मतदारांना लांब रांगांमध्ये उभे राहावे लागले. काही मतदारांना मतदानासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, मतदानासाठी निवडणूक विभागाने दिलेल्या विशिष्ट पेनचाच वापर करण्याचा नियम असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. मात्र, मतदारांच्या खिशात असलेला साधा पेनही बाहेर ठेवण्यास सांगण्यात आल्याने नाराजी पसरली.
मतदारांना नियमांची पूर्वकल्पना किंवा प्रवेशद्वारावर स्पष्ट माहिती देण्याऐवजी अशा प्रकारे अडवणूक करणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यातच मतदान केंद्राच्या आवारात पुरेशा मंडपाची सोय नव्हती. मतदारांसाठी बसण्याची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सुविधाही अपुरी होती. गर्दी आणि हवा खेळती नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. या अव्यवस्थेचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांना बसला. मतदानाची संथ प्रक्रिया आणि प्रचंड गर्दीमुळे निर्धारित वेळेनंतरही मतदान सुरू होते. सायंकाळी ४ वाजल्यानंतरदेखील अनेक मतदार रांगेत होते. दरम्यान, २ हजार २२७ पैकी सुमारे १ हजार ५२० मतदारांनी, अर्थात जवळपास ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
रेल्वे फाटक आणि धुळीच्या रस्त्याचा मनस्ताप...
तहसील कार्यालयाकडे जाणार्या मार्गावरील रेल्वे फाटक वारंवार बंद होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. रेल्वेच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून परिसरात धुळीचे साम्राज्य होते. परिणामी, मतदान केंद्रापर्यंत पोहोचणेही मतदारांसाठी दिव्य ठरले.
मध्यवर्ती शाळांचा पर्याय का डावलला?...
शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळा, शहीद मिश्रा विद्यालय किंवा जिल्हा परिषद कन्या शाळेत मतदान केंद्र उभारले असते, तर मतदारांची गैरसोय टाळता आली असती. या ठिकाणी लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांची मतदान केंद्रे नियमितपणे उभारली जातात. तरीही पदवीधर निवडणुकीसाठी गैरसोयीचे तहसील कार्यालयच का निवडण्यात आले, असा प्रश्न मतदारांनी उपस्थित केला.