२० लाखांचे ५० मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी: सीईआयआर प्रणालीचा वापर

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
gondia-city-police शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील चार महिन्यांत विविध ठिकाणांहून हरविलेल्या तब्बल ५० अँड्रॉइड मोबाईलचा शोध घेण्यात गोंदिया शहर पोलिसांना यश आले आहे. अंदाजे २० लाख रुपये किमतीचे हे मोबाईल २४ ऑक्टोबर रोजी मूळ मालकांना परत करण्यात आले. हरविलेले मोबाईल पुन्हा हाती मिळाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
 

gondia-city-police 
 
गोंदिया शहर पोलिस ठाण्यात मागील चार महिन्यांत विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी गंभीर दखल घेत हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे निर्देश गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले. त्यानुसार पोलिस शिपाई अशोक रहांगडाले यांनी केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) प्रणालीवर हरविलेल्या मोबाईलसंदर्भातील अर्ज अपलोड केले. त्यानंतर गोंदिया शहर डी. बी. पथकाच्या मदतीने शास्त्रोक्त पद्धती आणि बुद्धिकौशल्याचा वापर करून हरविलेल्या ५० मोबाईलचा शोध घेण्यात आला. दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश शुक्ला, पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मडावी आणि महिला पोलिस उपनिरीक्षक बेस यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.
 
 
आमगावात १८ मोबाईल केले परत...
आमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तसेच परिसरातील विविध ठिकाणांहून मागील चार महिन्यांत हरवलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या १८ मोबाईल फोनचा शोध घेण्यात आमगाव पोलिसांना यश आले आहे. केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन २ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. सर्व मोबाईल २३ ऑक्टोबर रोजी पोलिस निरीक्षक निलकंठ कुकडे यांच्या हस्ते संबंधित मोबाईलधारकांना परत करण्यात आले.
 
 
मोहिमेत यांनी घेतला सहभाग...
गोंदिया व आमगाव येथे राबविण्यात आलेल्या मोहिमेत गोंदियात पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मडावी, महिला पोलिस उपनिरीक्षक बेस, सहायक फौजदार कवलपालसिंग भाटिया, पोलिस हवालदार सुदेश टेंभरे, पोलिस शिपाई अशोक रहांगडाले, सुभाष सोनवाने आणि राकेश बंजारे तर आमगावात पोलिस निरीक्षक निलकंठ कुकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस हवालदार असीम मन्यार, पोलिस शिपाई चेतन शेंडे, अजय पटले, मिलनसिंग मंजूटे यांनी सहभाग घेतला.