दिवाळी तोंडावर, केंद्रप्रमुखांचे वेतन मात्र रखडले!

पालकमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
प्राथमिक शिक्षण संचालकांना दूरध्वनीद्वारे वेतन अदा करण्याच्या सूचना
 
समुद्रपूर,
guardian-minister दिवाळीसारखा सण तोंडावर असताना राज्यातील केंद्रप्रमुखांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळातही वेतन रखडल्यामुळे केंद्रप्रमुखांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची तात्काळ दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालकांना दूरध्वनीद्बारे वेतन अदा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
 
 
guardian-minister
 
दसरा, दिवाळी हे आनंदाचे आणि कुटुंबासोबत साजरे करण्याचे महत्त्वाचे सण आहे. मात्र, वेळेवर वेतन मिळत नसल्याने सणासुदीच्या खर्चाचे नियोजन करताना केंद्रप्रमुखांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता न आल्यास विलंब शुल्क व दंड आकारला जातो. यामुळे आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे. केंद्रप्रमुख हे शालेय शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे यासारख्या जबाबदार्‍या पार पाडत असतात. असे असतानाही त्यांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित राहणे ही चिंतेची बाब असल्याचे संघटनेने निवेदनातून निदर्शनास आणून दिले. केंद्रप्रमुखांचे वेतन नियमित व वेळेत अदा करावे, वेतनासाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून द्यावा आणि भविष्यात अशाप्रकारे वेतन रखडणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
 
 
संघटनेच्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री डॉ. भोयर यांनी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून केंद्रप्रमुखांचे रखडलेले वेतन तातडीने अदा करण्याबाबत सूचना दिल्या. यामुळे केंद्रप्रमुखांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यत होत आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघांचे पदाधिकारी वसंत खोडे, रवींद्र राठोड, विनोद पालवे, विनोद महाजन, मुकुंद बोराडे आणि करुणा शंभरकर उपस्थित होते.