पराग मगर
नागपूर,
mythasur श्रद्धा कधीकधी सत्तेचे साधन बनून भयाच्या आधारे समाजावर नियंत्रण कसे प्रस्थापित करते आणि मिथकांच्या आड वास्तव कसे दडविले जाते, अशा प्रश्नांचा वेध घेणाऱ्या ‘मिथ्यासूर’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी रामदासपेठेतील राष्ट्रभाषा भवन परिसरात झाला. विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिती आणि मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त वतीने आयोजित या नाट्यप्रयोगातून आस्था, सत्ता, सत्य आणि विवेक यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला. मुंबईच्या उजागर ड्रॅमॅटिक असोसिएशनद्वारे हे नाटक सादर करण्यात आले.

अठराव्या शतकातील हिंदुस्थानच्या पृष्ठभूमीवर घडणारे हे नाटक एका छोट्या संस्थानातील प्राचीन मंदिराचा मुख्य पुजारी सोमदेव आणि त्याच्या स्वप्नांत प्रकट होणारा असुरराज कुंभ यांच्याभोवती फिरते. असुरराजाच्या कथित दैवी संकेतांनुसार संस्थानाचा कारभार चालतो. मात्र, असुरराज अचानक सोमदेवच्या स्वप्नांत येणे बंद करतो आणि संपूर्ण व्यवस्थेचा पायाच डळमळीत होतो. दैवी संकेतांचा आधार हरवलेल्या सोमदेवसमोर श्रद्धा, अधिकार आणि सत्याविषयीचे प्रश्न उभे राहतात. त्याचवेळी ईस्ट इंडिया कंपनीकडून युद्धाचा धोका निर्माण झाल्याने संस्थानाचे अस्तित्वही अनिश्चित बनते. या पेचप्रसंगात त्याची भेट विज्ञान, तर्क आणि मानवी विवेकावर विश्वास असलेल्या राजकुमारीशी होते. या दोन परस्परविरोधी दृष्टिकोनांतील संघर्षातून नाटकाची वैचारिक गुंफण उलगडत जाते.
मिथकाच्या आवरणाआडील सत्ताकारण
‘मिथ्यासूर’ची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी म्हणजे यात देव-असुरांचा संघर्ष केवळ चांगले आणि वाईट यांच्यातील लढाई म्हणून समोर येत नाही. उलट, श्रद्धा आणि भ्रम यांच्यातील सीमारेषा कोण ठरवते, सत्तेला धर्माचा आधार मिळाल्यावर प्रश्न विचारण्याची जागा किती उरते आणि ज्ञानाच्या अभावाचा फायदा कोणाला होतो, अशा प्रश्नांना नाटक भिडते. मिथकांच्या परिचित विश्वाचा आधार घेत समकालीन समाजातील सत्तासंबंध आणि मानवी मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न यातून दिसतो.
अभिनय, हालचाली आणि प्रकाशयोजनेची सांगड
प्रणय पांडेय लिखित आणि अजित सिंह पल्लावत दिग्दर्शित या नाटकात विजय पाटीदार यांनी सोमदेवची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. साहिल आहुजा यांच्यासह प्रतीक्षा कोटे, शुभम पारिक, अभिनव परमार, अभिनंदन गुप्ता आणि अन्य कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या. इप्शिता चक्रवर्ती सिंह यांचे दिग्दर्शन व वेशभूषा-कला संकल्पना, अम्मन्नूर माधव चाक्यार यांची मंच रचना, अजित सिंह पल्लावत यांची प्रकाशयोजना आणि मोहित अग्रवाल यांचे संगीत संयोजन हे या निर्मितीचे महत्त्वाचे घटक आहेत.