वॉशिंग्टन,
Trump’s direct threat to Iran अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणाविरोधात नव्या लष्करी कारवाईचे स्पष्ट संकेत देत वॉशिंग्टन आणखी एक मोठे ऑपरेशन सुरू करू शकते असा इशारा दिला आहे. या वक्तव्याच्या काही तास आधीच एका अमेरिकन दूताने या विकेंडपर्यंत इराणावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला जाऊ शकतो असे सांगितले होते. शुक्रवारी फ्लोरिडा येथील रॅलीत ट्रम्प म्हणाले की, "आम्ही आणखी एक 'एपिक फ्युरी' (Epic Fury) करू शकतो." ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणी अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे की, अमेरिका आणि इस्रायलने जर पुन्हा आक्रमण केले तर इराण खाडीतील समुद्राखाली पसरलेल्या इंटरनेट केबल्सना थेट लक्ष्य करू शकतो.
इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या राजकीय घडामोडींचे उपप्रमुख यदोल्लाह जावानी यांनी सांगितले की, इराणी पायाभूत सुविधांवर हल्ला झाल्यास इराण होर्मुजच्या खाली असलेल्या सात प्रमुख इंटरनेट केबल्स कापून टाकेल. समुद्राच्या तळाशी असलेल्या या केबल्स जगातील जवळपास नव्व्याण्णव टक्के इंटरनेट ट्रॅफिक वाहून नेण्याचे काम करतात, त्यामुळे त्या कापल्या गेल्यास इंटरनेटचा वेग मंदावून आर्थिक व्यवहार, ऑनलाईन व्यवसाय आणि क्लाउड सेवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच युद्धाच्या काळात विमा खर्च वाढल्याने आणि परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने या केबल्सची दुरुस्ती करणेही अत्यंत कठीण ठरू शकते.
दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे इराणावर पुन्हा हल्ल्याची धमकी दिली असली, तरी त्याआधी त्यांनी अमेरिका हे युद्ध अतिशय वेगाने आणि लवकर संपवू शकते असेही म्हटले होते. अमेरिकेने हे युद्ध लगेच थांबवायला हवे की त्याला हळूहळू कमकुवत होऊ दिले पाहिजे असा प्रश्न त्यांनी स्वतःच उपस्थित केला होता. ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की अमेरिकेकडे युद्ध संपवण्याची पूर्ण क्षमता आहे आणि अमेरिकेला जे हवे आहे ते सर्व मिळत असून त्यांचे तेल होर्मुजच्या मार्गाने सातत्याने येत आहे.