मानिला
aircraft collide फिलीपिन्सच्या राजधानी मानिलाच्या दक्षिणेस असलेल्या बातांगस प्रांतातील फर्नांडो एअर बेसवर शुक्रवारी सराव उड्डाणादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे नियमित सरावासाठी हवेत झेपावलेली ‘SF-260’ मॉडेलची दोन प्रशिक्षण विमाने अचानक अनियंत्रित होऊन हवेतच एकमेकांवर जोराने आदळली. या भीषण धडकेनंतर दोन्ही विमाने क्षणात एअर बेसच्या आवारातच जमिनीवर कोसळली. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने लष्कराच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात दोन्ही विमानांमधील 4 वैमानिकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून फिलिपिन्स हवाई दलावर मोठी शोककळा पसरली आहे.

अपघाताचे नेमके कारण काय होते, म्हणजेच ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली की मानवी चुकीमुळे, याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून तत्काळ उच्चस्तरीय तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फिलीपिन्स हवाई दलाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. सखोल तपास पूर्ण होईपर्यंत आणि सुरक्षेची खात्री पटत नाही, तोपर्यंत हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व SF-260 प्रशिक्षक विमानांच्या उड्डाणांवर तातडीने पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
‘SF-260’ विमानांचा इतिहास आणि अपघातांची लागलेली मालिका
फिलीपिन्स हवाई दलात SF-260 विमानांचे अपघात घडण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्या आहेत. वर्ष 2023 मध्ये सराव उड्डाणादरम्यान ‘SF-260 TP Marchetti’ हे विमान कोसळून 2 वैमानिक शहीद झाले होते, तर यापूर्वी मे महिन्यातही उत्तरेकडील पर्वतीय भागात असेच एक विमान कोसळून 2 वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला होता. अपघातांची ही सातत्याने लागलेली मालिका हवाई दलाच्या सुरक्षेवर आणि विमानांच्या देखभालीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
नवशिक्या वैमानिकांचे प्रशिक्षण ते लष्करी मोहिमांमधील योगदान
सामान्यतः SF-260 या हलक्या विमानांचा वापर नवशिक्या वैमानिकांना सुरुवातीचे धडे आणि प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. मात्र, केवळ प्रशिक्षणापुरतीच मर्यादित न राहता या विमानांनी लष्करी मोहिमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वर्ष 2017 मध्ये जेव्हा इसिस (ISIS) समर्थक दहशतवाद्यांनी दक्षिण फिलीपिन्सच्या मरावी शहरावर ताबा मिळवला होता, तेव्हा लष्कराने या विमानांचा वापर प्रत्यक्ष हवाई हल्ल्यांसाठी केला होता. सध्याच्या अपघातात सुदैवाने एअर बेस परिसरातील अन्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही.