मुंबई
vidya malavade सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका चुकीच्या व्यवहारामुळे किंवा गोपनीय माहितीचा गैरवापर झाल्यामुळे अनेक वर्षांची बचत क्षणात गमावण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. अभिनेत्री विद्या मालवडे यांनाही त्यांच्या घरात घडलेल्या अशाच एका घटनेचा धक्का बसला. गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम एका PIN च्या गैरवापरामुळे गायब झाली होती. या वास्तव घटनेचा उल्लेख करत विद्याने सायबर फसवणुकीबाबत प्रत्येकाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
स्टोरी टीव्हीच्या ‘स्कॅम २०२४ – द डिजिटल अरेस्ट स्टोरी’ या मालिकेत प्रिया शर्मा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विद्या मालवडे यांनी मालिकेविषयी बोलताना हा अनुभव कथन केला. या मालिकेत काम करण्यामागे स्वतःच्या घरात घडलेली घटना हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या बँक खात्यातील पैसे अचानक गायब झाल्याचे लक्षात आले, तेव्हा या घटनेचे गांभीर्य त्यांच्या समोर आले.
या प्रसंगाविषयी सांगताना विद्या म्हणाल्या, “मी ‘स्कॅम २०२४’ करण्यामागचे एक कारण म्हणजे माझ्या घरातच अशी घटना घडली होती. गेल्या १५ वर्षांपासून माझ्याकडे काम करणाऱ्या महिलेच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम एका PIN मुळे गायब झाली. ती एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती. मात्र, पैसे निघत नसल्याने परत येऊन तिने मला, ‘दीदी, काय झालं? मला पैसे काढायचे होते, पण ते होतच नाहीये,’ असे सांगितले. त्यानंतर मी तिचे पासबुक तपासले, तेव्हा खात्यात काहीच शिल्लक नसल्याचे दिसून आले.” साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने आपल्याला मोठा धक्का दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सायबर फसवणुकीचा धोका हा केवळ शिक्षित किंवा तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या व्यक्तींपुरता मर्यादित नाही, याकडे विद्याने लक्ष वेधले. शिक्षण किंवा सामाजिक पार्श्वभूमी काहीही असली, तरी कोणतीही व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकते, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे डिजिटल व्यवहार करताना जागरूक राहणे आणि बँकिंगविषयक गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘स्कॅम २०२४ – द डिजिटल अरेस्ट स्टोरी’ या मालिकेतvidya malavade प्रिया शर्मा या महिलेची कथा मांडण्यात आली आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला बळी पडल्यानंतर तिच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडतात, हे या कथेतून दाखवण्यात आले आहे. बनावट ओळख धारण करणे, धमकावणे आणि भीती निर्माण करून संबंधित व्यक्तीवर मानसिक दबाव आणणे, अशा मार्गांनी सायबर गुन्हेगार नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत पीडित व्यक्तीला जाणवणारी भीती आणि असहायता मालिकेतून अधोरेखित केली आहे.
विद्या मालवडे यांचा वैयक्तिक अनुभव आणि मालिकेतील कथानक यांमुळे सायबर फसवणुकीचा प्रश्न अधिक जवळून समोर येतो. अनोळखी व्यक्तींकडून येणारे संशयास्पद फोन, संदेश, लिंक किंवा बँकिंगविषयक वैयक्तिक माहिती मागणाऱ्या विनंत्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांची खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना आर्थिक व्यवहारांबाबत सतर्कता बाळगणे ही काळाची गरज बनली आहे, असा संदेश या मालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.