देवळी
water-scarcity यंदा पाऊस कमी पडल्यामुळे देवळी शहरावर पाण्याचे मोठे संकट घोंघावत आहे. या पृष्ठभूमीवर पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शहराला तीव्र पाणीटंचाई भासू नये यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी बैठक घेतली. तसेच अंदोरी येथील पंपिंग स्टेशन आणि देवळी येथील पाणी पुरवठा विहिरीची पाहणी केली.
नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता व विद्युत विभागावर विशेष लक्ष देत सुरुवातीलाच त्यांनी दररोज पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे नगर परिषदेतर्फे दररोज पाणी पुरवठा सुरू असला तरी अंदोरी येथील पाण्याचा साठा पाहता आणि शासन-प्रशासन स्तरावरील सूचना लक्षात घेता भविष्यात एक दिवसाआड किंवा २ ते ३ दिवसाच्या अंतराने पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगराध्यक्ष ठाकरे यांनी केले आहे. पाण्याचे संकट लक्षात घेता प्रशासनाला तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
केवळ प्रशासकीय पातळीवर काम करून चालणार नाही तर नागरिकांची साथ आणि मानसिक तयारी अत्यंत गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात जलजागृती निर्माण व्हावी आणि प्रत्येक नागरिकाने सजग राहावे, ही आजची मुख्य गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.