रिसोडमध्ये युवकावर चाकूने हल्ला

दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :24-Oct-2026
Total Views |
रिसोड,
youth-attacked-with-a-knife-in-risod किरकोळ वादातून एका २५ वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना २२ ऑटोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रिसोड शहरातील बसस्थानक रोडवरील देशमुख यांच्या पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
youth-attacked-with-a-knife-in-risod
 
याबाबत अमन पंजाबराव वाघ (वय २५, रा. स्वामी विवेकानंद नगर, रिसोड) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. अमन हा एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. २० ऑटोबर रोजी दसर्‍याच्या दिवशी त्याचा सत्यजित सरनाईक याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता.२२ ऑटोबर रोजी रात्री अमन हा त्याचा मित्र विजय शिंदे याच्यासोबत दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी बसस्थानक रोडवरील पेट्रोल पंपावर गेला होता. त्याचा मित्र पेट्रोल भरण्याच्या रांगेत उभा असताना अमन बाजूला थांबला होता. यावेळी सत्यजित सरनाईक व त्याचा दाजी वेदांत गजानन काळे (रा. नांदेड) हे तेथे आले. सत्यजितने अमनकडे बोट दाखवून, दसर्‍याच्या दिवशी वाद झालेला हाच तो युवक असल्याचे सांगत त्याला सोडणार नसल्याचे म्हटल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर वेदांत काळे याने शिवीगाळ करून अमनला धरून ठेवल्याचे, तर सत्यजितने त्याच्याशी झटापट करत हातातील चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
 
 
या हल्ल्यात अमनच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ दुखापत झाली. यावेळी वेदांत काळे याने मारण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप आहे. तेथून पळून जात असताना सत्यजितने पुन्हा दिसल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याचे अमनने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास रिसोड पोलिस करीत आहेत.