वर्धा,
a-truck-loaded-with-wood-overturned जळाऊ लाकडाची वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या माईलस्टोनला धडकला. या धडकेनंतर ट्रक उलटला. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कांढळी परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील राजेश कुळमेथे (२९) हा एम. एच. ०४ एफ. पी. २४४७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये जळाऊ लाकूड भरून नागपूर-हैदराबाद महामार्गावरून कांढळी येथील कारखान्याकडे जात होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ट्रक कांढळी परिसरात आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या माईलस्टोनला धडकला. या धडकेमुळे ट्रक उलटला. शिवाय त्यातील लाकूड रस्त्यावर विखुरले. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तोडासे, कर्मचारी इंगोले आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मदतकार्य सुरू करून रस्त्यावर विखुरलेले लाकूड बाजूला केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.