नवी दिल्ली,
amit-shah-operation-trident-drug-racketकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती दिली. या कारवाईत सुरक्षा यंत्रणांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांमधील ३८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून १८ जणांना अटक केली. ‘ऑपरेशन ट्रायडंट’ असे या मोहिमेचे नाव असून, केंद्रीय यंत्रणा आणि तिन्ही राज्यांतील पोलीस दलांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमावर्ती भागातील ‘डेथ ट्रँगल कॉरिडॉर’च्या माध्यमातून हे रॅकेट अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे अमित शाह यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले.

या मोहिमेदरम्यान सुमारे १०० कोटी रुपयांचे हवाला व्यवहार उघडकीस आले असून, १,४२४ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. याशिवाय १७.८२ कोटी रुपयांची मालमत्ता, ५०० डिटोनेटर्स आणि १२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील केंद्र सरकारच्या मोहिमेचा पुनरुच्चार करताना, ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत भारताला अमली पदार्थमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. या यशस्वी मोहिमेबद्दल त्यांनी केंद्रीय यंत्रणा आणि तिन्ही राज्यांच्या पोलीस दलांचे अभिनंदन केले.
दरम्यान, पोलीस स्मृती दिनानिमित्त अमित शाह यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि सीमांच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली. नक्षलवादाविरोधातील लढा आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाईसह देशाच्या सुरक्षेत पोलीस दल व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या भूमीचा एक इंचही परकीयांच्या ताब्यात जाऊ नये, या निर्धाराने कर्तव्य बजावताना अनेक जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन पाळला जातो. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि सीमांच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही शाह यांनी सांगितले.