सायकलवरून डिलिव्हरी, डोळ्यांवर पट्टी अन् समोर स्कूटी!

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
मुंबई
anant ambani महागाई आणि वाढत्या खर्चामुळे स्वतःची दुचाकी घेणे शक्य न झालेल्या एका डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईत आनंदाचा अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या सुजीत नावाच्या तरुणाला उद्योगपती अनंत अंबानी यांच्याकडून नवी स्कूटी भेट देण्यात आली. अनपेक्षितपणे मिळालेली ही भेट पाहून सुजीत भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
 
 

anant ambani gifts scooter to blinkit delivery agent sujit in mumbai 
मुंबईतील इन्फ्लुएन्सर आणि सामाजिक कार्यकर्ते हुसेन मन्सुरी यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मन्सुरी सायकलवरून डिलिव्हरी करत असलेल्या सुजीतला थांबवून तो दुचाकी का घेत नाही, अशी विचारणा करताना दिसतात. त्यावर सुजीतने आपली आर्थिक अडचण सांगितली. कमी पगार आणि वाढत्या महागाईमुळे दुचाकी खरेदी करणे शक्य नसल्याचे त्याने सांगितले.
यानंतर मन्सुरी यांनी सुजीतला डिलिव्हरी पूर्ण करून पुन्हा येण्यास सांगितले आणि त्याच्यासाठी एक सरप्राइज असल्याचे सूचित केले. सुजीत परतल्यानंतर त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला लाल कापडाने झाकलेल्या एका भेटवस्तूजवळ नेण्यात आले. त्यानंतर मन्सुरी यांनी ही भेट अनंत अंबानी यांच्याकडून असल्याचे सांगत कापड बाजूला केले.
समोर नवी कोरी स्कूटी दिसताच सुजीतला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. काही क्षणांतच तो भावूक झाला आणि त्याने मन्सुरी यांना मिठी मारली. या वेळी त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. स्वतःची दुचाकी घेण्याचे स्वप्न आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेल्या सुजीतसाठी ही भेट विशेष ठरली.
या भेटीनंतर सुजीतने स्कूटीसोबत छायाचित्र काढले. आयुष्यातील हा क्षण कायम लक्षात राहील, अशी भावना त्याने व्यक्त केली. मन्सुरी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत असून, त्याला ४.६ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचे वृत्त आहे. सुजीतच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्याची भावनिक प्रतिक्रिया पाहून अनेक नेटकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.