अरुणाचलमध्ये NHPC कार्यालय आणि पोलीस ठाणे पेटवले!

भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची तोडफोड

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
अरुणाच,
arunachal-siang-project-violenceप्रस्तावित 11,200 मेगावॅटच्या सियांग प्रकल्पाच्या विरोधात अरुणाचल प्रदेशात हिंसाचार उसळला. जमावाने एनएचपीसी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला आग लावली. सात-आठ पोलीस वाहनेही जाळण्यात आली. आंदोलकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष कलिंग मोयोंग आणि आमदारांच्या घरांची तोडफोड केली. दगडफेकीत एका डीएसपीसह अनेक पोलीस जखमी झाले. चीनमधून येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि पुराचा धोका कमी करणे, हा या प्रस्तावित धरणाचा उद्देश आहे.
 
chal
शुक्रवारी सियांग, अप्पर सियांग आणि पूर्व सियांग जिल्ह्यांमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बंद दरम्यान सियांग जिल्ह्यातील सुमारे 150 ते 200 आंदोलकांनी पोलीस वाहनांची तोडफोड केली आणि बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी दाओ, काठ्या आणि गोफणी बाळगल्या होत्या. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यामुळे सुरक्षा दलांना अश्रुधूर सोडावा लागला. मेबोमधील रानाघाट पुलाजवळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षही झाला.
 
आदिवासी संघटनेच्या कार्यालयाचीही तोडफोड
पासीघाटचे डीएसपी टोनी ताताक यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलक मेबो भागातून आले होते. जमावाने आदिवासी समाजाची मुख्य संघटना असलेल्या 'आदी बाने केबांग'च्या कार्यालयाचीही तोडफोड केली. पोलीस नुकसानीचा आढावा घेत आहेत. आमदार निनोंग एरिंग यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास 300-400 तरुण त्यांच्या घरी आले. त्यांनी तोडफोड करून मालमत्ता लुटली.