गडचिरोली,
Death of a mother and her newborn एकीकडे गडचिरोली जिल्ह्याला 'स्टील सिटी' बनवण्याचे स्वप्न दाखवले जात असताना दुसरीकडे मात्र याच जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या रेखनार गावातील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय पार्वती झोरे यांचा २५ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. प्रसूतीनंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर प्रकृती खालावल्याने पार्वती यांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी न्यावे लागले; परंतु आर्थिक परिस्थिती, पक्क्या रस्त्यांचा अभाव आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यात आलेल्या अडचणींमुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही. या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेखनार ते चोखेवाडा हे सुमारे १५ किलोमीटरचे अंतर असून गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने पार्वती यांना गर्भावस्थेपासूनच अडचणींचा सामना करावा लागला होता. प्रसूतीच्या वेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णालयात पोहोचणे कठीण होईल या भीतीने त्यांना आधीच माहेरच्या पैंडी गावात हलवण्यात आले होते. २९ सप्टेंबर रोजी प्रसववेदना सुरू झाल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याच दिवशी त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले. ३० सप्टेंबर रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला, परंतु बाळाच्या कमी वजनामुळे अतिदक्षता विभागात तीन दिवस उपचार सुरू असतानाच बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर पार्वती यांचीही प्रकृती खालावत गेली आणि अखेर २५ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका सुविधा आणि गरीब रुग्णांना वेळेवर परवडणाऱ्या उपचारांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.