पासीघाट,
Dispute over dam in Arunachal अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथे प्रस्तावित ११,२०० मेगावॉट क्षमतेच्या 'सियांग अपर मल्टीपर्पज प्रोजेक्ट'च्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने पाऊल उचलत रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) च्या दोन कंपन्या तेथे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) सुमारे २५० जवानांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने नवी मुंबई येथून पासीघाट येथे एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
पूर्वी सियांग जिल्ह्यातील पासीघाट येथे शुक्रवारी रात्री आंदोलकांचा जमाव अचानक आक्रमक झाला. या हिंसेदरम्यान आंदोलकांनी एनएचपीसी (NHPC) चे कार्यालय आणि एका पोलीस ठाण्याला आग लावली. याशिवाय राज्य भाजप अध्यक्ष आणि दोन आमदारांच्या निवासस्थानांचीही तोडफोड करून लुटालूट केली. सुमारे नऊ तास टप्प्याटप्प्याने चाललेल्या या हिंसाचारात आणि दगडफेकीत ४० हून अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत, तर अश्रूधुराचा गोळा लागल्याने एक आंदोलकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्वी सियांग जिल्हा प्रशासनाने पासीघाट, मेबो आणि रुकसिन या भागात सार्वजनिक सभा, रॅली आणि मिरवणुका काढण्यावर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. तसेच संवेदनशील भागात तैनात सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांच्या तुकड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फ्लॅग मार्च काढला आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पासीघाटमधील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असला तरी तो कायद्याच्या चौकटीत राहूनच झाला पाहिजे, सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणे अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तिबेटमध्ये चीनकडून बांधल्या जाणाऱ्या विशाल धरणाला प्रत्युत्तर म्हणून या प्रस्तावित ११,२०० मेगावॉटच्या सियांग प्रकल्पाकडे पाहिले जात आहे; मात्र स्थानिक आदिवासी समुदाय याला सातत्याने विरोध करत आहेत. या धरणाच्या विशाल जलाशयामुळे अनेक गावे, सुपीक जमिनी पाण्याखाली जातील आणि त्यांचे शतकानुशतकांचे नैसर्गिक व सांस्कृतिक नाते नष्ट होईल, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे. तिबेटमधून उगम पावणारी सियांग नदी पुढे आसाममध्ये दिबांग आणि लोहित नद्यांना मिळून ब्रह्मपुत्रा नदी बनते.