केरळ
kerala केरळमधील एर्नाकुलम शहरात भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे घडलेल्या या अपघातात न्यायाधीशाचा अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी रात्री स्टॉल बंद केल्यानंतर ते स्कूटरवरून घरी परतत होते. त्याचदरम्यान, रविवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या मर्सिडीज कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी सामान विखुरलेले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणात मृत व्यक्तीच्या भाचीने न्यायाधीशांबाबत गंभीर आरोप केले आहेत. अपघातानंतर न्यायाधीश पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलाला कार चालवण्याची परवानगी का देण्यात आली, असा सवाल केला असता न्यायाधीशांनी अपमानास्पद भाषेत उत्तर दिल्याचा दावा भाचीने केला आहे.
मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून, या संदर्भातील अधिकृत बाजू समोर येणे महत्त्वाचे आहे.
पोलिसांच्या kerala प्राथमिक तपासात अपघातातील मर्सिडीज कार न्यायाधीशांच्या नावावर असल्याचे समोर आल्याची माहिती आहे. कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडे वैध वाहनचालक परवाना होता का, तसेच अपघाताच्या वेळी तो मद्याच्या प्रभावाखाली होता का, याची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताची परिस्थिती, वाहनाचा वेग आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा तपास पोलीस करत आहेत.