एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!

नोव्हेंबरचा पगार सणापूर्वी देण्याचे सरनाईकांचे निर्देश

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
मुंबई
msrtc महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना सणाचा खर्च वेळेत करता यावा, यासाठी नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 

msrtc employees to receive november salary before diwali, announces pratap sarnaik 
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन दिले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असल्याने नियमित वेतनाच्या तारखेपूर्वीच पगार देण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सणासाठीची खरेदी, घरगुती खर्च आणि इतर आर्थिक नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात दिवाळीपूर्वी वेतन पडणे महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन सरनाईक यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
वेतन वेळेत देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने राज्य शासनाकडे त्वरित पाठपुरावा करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी आवश्यक असलेले शासकीय अनुदान तसेच मागील काही महिन्यांतील प्रवासी सवलतींपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत.
महामंडळाच्या आर्थिक msrtc  अडचणींचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर होऊ नये, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाशी योग्य समन्वय राखून दिवाळीपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात वेतन जमा होईल, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी बजावले आहे.
या निर्देशांमुळे एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता शासनाकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध होतो का आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी वेतन जमा करण्याची प्रक्रिया कितपत लवकर पूर्ण होते, याकडे लक्ष लागले आहे.