अनिल कांबळे
नागपूर,
fake rape case राजस्थानातील एका व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी एका अभियंत्याने प्रेयसीला बलात्कार केल्याची खोटी तक्रार पोलिसांत देण्याचा कट रचला. तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी आरोपींचे कटकारस्थान उघडकीस आणले. आरोपी उच्चशिक्षित असून पोलिसांनी त्याला पुण्यातील येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. आदित्य सुरेशचंद्र गुप्ता (३०) असे तहसील पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार केल्याची तक्रार देणारी २४ वर्षीय तरुणी सौम्या (नाव बदललेले) ही सोशल मीडियावर सक्रिय असून चित्रपट सृष्टीशी जुळलेली आहे. ती ‘मीका ॲप’ द्वारे आदित्य सुरेशचंद्र गुप्ता (३०) याच्याशी संपर्कात आली होती. आदित्यने सौम्या हिला नोकरी आणि बक्कल पैसै कमावण्यासाठी व्यवसायात भागीदार करण्याचे आमिष दाखवत तिला जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिला प्रेमात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवत सौम्या हिने आदित्य गुप्ताने सांगितल्यानुसार राजस्थान राज्यातील रतनगढ येथील इरफान अली सलीम तेली याच्याविरुद्ध लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलची तक्रार केली. या तक्रारीच्या बदल्यात आदित्यने सौम्या हिला ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. हा तपास ठाणेदार संजय मेंढेच्या मार्गदर्शनात धनराज सिंगुनवार करीत असताना त्यांना सौम्या हिने दिलेली तक्रार बनावट असल्याचे आढळले. प्रत्यक्षात सौम्या ही इरफान अली यांना कधी भेटली देखील नव्हती. तरीही तिने इरफान विरोधात तक्रार का केली याचा पोलिस शोध घेत होते. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता आरोपी आदित्य गुप्ता याच्या सांगण्यावरून सौम्याने ही तक्रार केल्याचे आढळले.
३ कोटींच्या खंडणीचा कट
इरफान अली विरोधात तक्रार fake rape case देण्यास भाग पाडण्यामागे गुप्ताचे वेगळेच कारस्थान होते. त्याला इरफानकडून ३ कोटी रुपयांची खंडणी उकळायची होती. यासाठी आदित्यने हा बनाव करत कट रचल्याचे तपासातून निष्पन्न झाले. आदित्य विरोधात अशाच स्वरुपाचा एक गुन्हा पुणे येथील चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्या प्रकरणात आदित्य हा येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. त्याने बनावट फौजदारी गुन्ह्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तहसील पोलिसांनी त्याला चौकशीसाठी येरवडा कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वनिता साहू, पोलिस उपायुक्त राहुल मदने आणि एसीपी शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उपनिरीक्षक संदीप भिताळे, नितीन मिश्रा, धनराज सिंगुनवार, विनोद गवई, सचिन अस्वार, पंकज मारसिंगे, इरफान पठाण आणि महेंद्र सेलुकर यांनी कारवाईत सहकार्य केले