नागपूर,
nagpur-water-wastage-inspectionनागपूर शहरात पुढील काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध जलसाठ्याचा अपव्यय टळाता यावा यासंदर्भात उपाय योजनेसाठी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक पार पडली. बैठकीत पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यय तात्काळ थांबवण्यासाठी शहरातील सर्व वाहने धुण्याचे केंद्र अर्थात वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांची अर्थात स्विमिंग पूल सखोल तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.
मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात पार पडलेल्या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. राजेश दुफारे, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय जाधव, श्री. राजकुमार मेश्राम, श्री. प्रमोद वानखेडे, श्री. अशोक घराटे, श्री. अनिकेत धोपट, श्री. अनुज कोपुलवार, श्री. सौरभ कावळे, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, ओसीएलडब्ल्यूचे प्रतिनिधी श्री. कुशल अतकरे यांच्यासह जलप्रदाय विभागाचे इतर सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरातील पाण्याचा होणारा अपव्यय तात्काळ थांबवण्यासाठी शहरातील सर्व वाहने धुण्याचे केंद्र आणि जलतरण तलावांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा नियमबाह्य व अवाजवी वापर होत असल्यास किंवा पाण्याची नासाडी आढळल्यास संबंधित चालकांवर व मालकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे करण्याचेही त्यांनी सुचविले. पिण्याच्या पाण्याचा वापर कार धुण्यासाठी, रस्ते धुण्यासाठी, बागकामासाठी, बांधकामाच्या कामांसाठी करताना आढळल्यास प्रत्येक घटनेसाठी ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचेही त्यांनी यावेळी निर्देश दिले. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ 58 टक्के साठा उपलब्ध आहे.
सणासुदीचा काळ असला तरी बेकायदेशीर जोडण्यांद्वारे पाणी घेणाऱ्यांविरुद्ध कठोर मोहीम राबविण्यात येणार आहे. अशा ग्राहकांना त्यांची जोडणी बेकायदेशीरवरून कायदेशीर करून घेण्याची संधी देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तात्काळ शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर बेकायदेशीर जोडणीच्या ठिकाणी मीटर बसवावेत आणि मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे किंवा तो काढून टाकल्याचे आढळल्यास अशा दोषी ग्राहकांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात यावे असेही त्यांनी सुचविले.
शहरातील सार्वजनिक विहिरींची स्वच्छता आणि सौर पंपांची स्थापना करून लघु पाणीपुरवठा योजनासुरू करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. जलाशयांमधून होणारा पाण्याचा वापर कमी करण्यासाठी, सध्याच्या विहिरींची प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता तपासून स्वच्छ करून एमईडीए च्या मदतीने सौर पंप बसविणे आणि लघु पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे प्रस्तावित आहे. अशा योजनांमधून मिळणारे पाणी वाहनांची धुलाई, बागकाम इत्यादी पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरता येईल.
भूजल सर्वेक्षण प्राधिकरणा च्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त पुनर्भरण संरचना निर्माण करणे, जीएसडीए यांच्या मदतीने विहीर आणि बोअरवेलचे पुनरुज्जीवन करण्यात यावे.
योग्य ठिकाणी विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम करण्यात येईल, जेणेकरून प्रक्रिया केलेले पाणी उद्याने, दुभाजकांमधील वृक्षारोपण, बांधकामाची कामे इत्यादींसाठी वापरता येईल. शहरातील जलवाहिन्यांमधून होणारी गळती तात्काळ दुरुस्त करण्याचे यावेळीही निर्देश त्यांनी दिले.