वादळाचे सावट...ओडिशामध्ये ओड्राफ आणि एनडीआरएफच्या तैनात

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
भुवनेश्वर,
NDRF deployment in Odisha ओडिशामध्ये संभाव्य चक्रवाती वादळाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने आपल्या तयारीला वेग दिला आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी लोक सेवा भवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळीही कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ न देणे (शून्य हानी) हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे चक्रवाती वादळ २८ ऑक्टोबर रोजी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीदरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे; मात्र हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता अधिक आहे. या वादळाच्या प्रभावामुळे ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
vadals
 
वादळाचा वाढता धोका पाहता गंजाम, गजपति, रायगडा, कोरापुट आणि मलकानगिरी या पाच जिल्ह्यांमधील शाळा, कॉलेज आणि अंगणवाडी केंद्रांना २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर इतर जिल्ह्यांमधील परिस्थिती पाहून स्थानिक जिल्हाधिकारी सुट्टीबाबतचा निर्णय घेतील. दक्षिण ओडिशातील जिल्ह्यांमध्ये या मुसळधार पावसाचा आणि तीव्र वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असून तटीय जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.संभाव्य आपत्तीशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारने मदत आणि बचाव पथकांना पूर्णपणे सज्ज ठेवले आहे. यासाठी ओडिशा आपत्ती त्वरित कारवाई बलाच्या (ODRAF) सुमारे ६० तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाच्या (NDRF) १७ तुकड्या आणि अग्निशमन दलाच्या २२५ तुकड्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी चक्रीवादळ व पूर निवारा केंद्रे सज्ज करण्यात आली असून, रुग्ण आणि गरोदर महिलांना वेळेत आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर दिला जात आहे.
 
 
मासेमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रभावित भागातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक असणारे अँटी-स्नेक वेनम इंजेक्शन, औषधे आणि वैद्यकीय किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्यावर पडणारी झाडे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करणे आणि वीज पुरवठ्यासह इतर अत्यावश्यक सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी संबंधित विभागांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. शेतातील पिकांच्या कापणीचा काळ जवळ आल्याने शेतकऱ्यांनी आपले पीक सुरक्षित कापून त्याची योग्य साठवणूक करावी, यासाठी त्यांच्यात जनजागृती केली जात आहे. संभाव्य चक्रावाती वादळादरम्यान नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि होणारे नुकसान कमीत कमी ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसात परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.