कुडाळ
Kudal Taluka कुडाळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. हिर्लोक पंचक्रोशीला या पावसाचा मोठा फटका बसला असून, अनेक दुकानांची छप्परे उडाली, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून, काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
काल झालेल्या मुसळधार पावसासोबतच जोरदार वारे वाहिल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे दुकानांच्या छप्परांचे नुकसान झाले, तर रस्त्यांवर झाडे कोसळल्याने काही भागांत अडथळे निर्माण झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले.
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना फटका
परतीचा मान्सून पाऊस संपल्यानंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम होत असून, आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पावसाचा फटका व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही बसला आहे.दिवसा वाढणारा उकाडा आणि रात्री जाणवणारा दमटपणा यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे चित्र आहे. सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा त्रास जाणवत आहे. राज्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच हवामानात सातत्याने बदल होत असल्याने त्याचा परिणाम शेती, व्यवसाय आणि जनजीवनावर होत आहे.अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून, वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा कमकुवत बांधकामांच्या आसपास थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.