भटक्या व विमुक्त जमाती पोटासाठी संघर्ष करीत देशासाठी लढली

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे प्रतिपादन

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
padma shri girish prabhune समाज व्यवस्थेच्या बाहेर फेकलेले आणि परकीय आक्रमकांनी देशोधडीला लावलेल्या भटक्या व विमुक्त जमाती म्हणजे संस्कृतीचा अविभाज्य भाग होते. त्यांना कुठले गाव नाही, शिव नाही, जिथे राहायचे तेच त्यांचे गाव. या जमातीने आयुष्यभर पोटासाठी संघर्ष केला. लोकांचे मनोरंजन केले. एवढेच नाही तर देशासाठी ते प्राणपणाने लढलेही, असे प्रतिपादन पुणे येथील पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
 
 

girish prabhune, padma shri, nomadic tribes, denotified tribes, bhatke vimukta jamati, karanja lad, sharad vyakhyanmala, tribal heritage, indian history, social justice, traditional medicine, cultural heritage, maharashtra news, latest marathi news
ते कारंजा येथील कै. नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत आज, २५ ऑक्टोबर रोजी दुसरे पुष्प गुफताना बोलत होते.
 
 
भटक्या व विमुक्त यांचे पालावरचे जीवन हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी शेखर बंग यांनी त्यांचे स्वागत केले. तर सचिन ताथोड यांनी परिचय करून दिला. भटक्या व विमुक्त जमातीच्या राष्ट्रीय व सामाजिक योगदानाबद्दल प्रभुने पुढे म्हणाले की, ही जमात ज्ञानवंत होती. त्यांना विविध रोगाविषयी, आयुर्वेदिक औषधी विषयी भरपूर माहिती होती. वैदू यांनी तर त्या काळात अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले आहे. एवढेच नाही तर रुग्णांवर शस्त्रक्रिया सुद्धा केलेल्या असल्याचे प्रभुणे यांनी सांगितले. कोणत्याच विद्यापीठात न जाता त्यांना वनस्पतीशास्त्राचा अभ्यास होता. शिल्पकलेत सुद्धा ते पारंगत होते. देशातील विविध भव्य मंदिरे, वेरूळची लेणी, अशोक स्तंभ यासारखी शिल्पे तसेच धातूची अवजारे त्यांनी तयार केली. या समाजामध्ये भिल्ल, वैदू, वडार, बहुरूपी, वासुदेव, नाथजोगी, कातकरी, नंदीबैलवाले, शिकलकार, कोल्हाटी, पारधी, बेरड, रामोशी, गारोडी असे अनेक समाज घटक आहेत. समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या या जमातीला ब्रिटिश सरकारने गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर अन्याय केला. स्वातंत्र्यानंतरही त्याच्यावर हा अन्याय सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानवंत, कलावंत व लढवय्या असलेल्या या पालावरील जमातीच्या लोकांचे जीवन बदलले पाहिजे. त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे. सगळ्या सुख सोयीपासून वंचित असलेल्या या लोकांच्या जीवनात स्थिरता व आनंद निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा प्रभुणे यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र खंडारे यांनी केले. तर डॉ. सुशील देशपांडे यांनी शारदास्तवन म्हटले.