बाल्कनीत कपडे वाळत घालण्यावर बंदी येणार?

महापालिकेच्या प्रस्तावाला नागरिकांचा विरोध

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
पुणे
pune municipal corporation शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता मुख्य रस्त्यांच्या दिशेने असलेल्या इमारतींच्या बाल्कनीत कपडे वाळत घालण्यावर निर्बंध आणण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. मात्र, या प्रस्तावामुळे पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, शहरातील मूलभूत समस्यांकडे आधी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 

pune municipal corporation proposes ban on drying clothes on balconies 
पुण्यातील अनेक इमारतींच्या बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये कपडे वाळत घातलेले दिसतात. विशेषतः मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या इमारतींमधील हा प्रकार शहराच्या सौंदर्यावर परिणाम करत असल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे रस्त्यांकडे असलेल्या बाल्कनीत कपडे वाळत घालण्यावर निर्बंध घालण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे समोर आले आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ संवाद’ कार्यक्रमात या विषयावर चर्चा झाली. यावेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मुख्य रस्त्यांकडे असलेल्या बाल्कनीत कपडे वाळत घालण्याच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्याबाबत प्रशासन विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या संभाव्य निर्णयाला pune municipal corporation नागरिकांकडून विरोध होत आहे. पुण्यात अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई आणि अन्य नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न कायम आहेत. नागरिकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत असताना, त्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक बाबींवर निर्बंध घालण्याऐवजी मूलभूत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.बाल्कनीत कपडे वाळत घालणे ही प्रत्येक घरातील दैनंदिन गरज असल्याने अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशीही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन या प्रस्तावाबाबत नेमकी कोणती भूमिका घेते आणि यावर अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.