नागपूर,
railway-police-duty-monitoring-appधावत्या रेल्वे गाडीत मदतीची गरज आहे... प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता लोहमार्ग पोलिस एका क्लिकवर मदतीला धावून येत आहेत. पोलिसांच्या ड्युटीवरील कर्मचाऱ्यांचे लोकेशन तत्काळ शोधून पोहोचविणाऱ्या मदत 'ड्युटी मॉनिटरिंग ॲप'मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. गत नऊ महिन्यांत या प्रणालीच्या माध्यमातून ५ हजार ४०० प्रवाशांना मदत करण्यात आली.रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी लोहमार्ग पोलिस कटिबद्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि ड्युटी मॉनिटरिंग ॲपची महत्त्वाची मदत होत आहे.
संकटाच्या वेळी प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने पोहोचणे या प्रणालीमुळे सोयीचे झाले आहे. या प्रणालीद्वारे ड्युटीवर तैनात असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रिअल टाईममध्ये माहिती मिळते. एखादा प्रवासी अडचणीत सापडून पोलिसांकडे मदत मागतो, तेव्हा त्याच्या सर्वाधिक जवळ कोणता अधिकारी किंवा कर्मचारी आहे, याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने संदेश पाठवून मदत पोहोचवली जाते.
या ॲपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांचे लोकेशनही ट्रॅक करता येते. त्यामुळे प्रवाशाला प्रवासादरम्यान मदतीची गरज भासल्यास संबंधित पोलिसांपर्यंत लवकर पोहोचणे शक्य होते. संकटाच्या वेळी मदत मिळण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरत आहे.