मोदींच्या हस्ते आरबीआयच्या डेटा सेंटरचे उद्घाटन

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |
भुवनेश्वर,
rbi-data-center-inaugurated-by-modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भुवनेश्वर येथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नव्या डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले. सुमारे १६९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सुविधेमुळे देशातील डिजिटल पायाभूत व्यवस्था आणि आर्थिक क्षेत्रातील सायबर सुरक्षेला बळ मिळणार आहे. सुरक्षित आर्थिक प्रणाली विकसित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
 
modi
 
देशाच्या विकासात पायाभूत सुविधांची भूमिका अधोरेखित करताना मोदी यांनी स्वातंत्र्यानंतर मोठ्या शहरांमध्ये रुग्णालये, विमानतळ आणि विविध महत्त्वाच्या संस्था उभारण्यात आल्याचे नमूद केले. मात्र, देशातील अनेक लहान शहरे आणि दुर्गम भागांना मूलभूत सुविधांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली, असे ते म्हणाले. मोठ्या शहरांमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध असताना ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारांसाठी दूरवर जावे लागत होते. त्याचप्रमाणे हवाई वाहतुकीच्या सुविधांचाही विस्तार प्रामुख्याने मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते, वीज, पाणी आणि आधुनिक रेल्वे सुविधांचा अभाव अनेक भागांसाठी मोठे आव्हान होते. देशातील प्रत्येक प्रदेशापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगत सरकारने या दृष्टिकोनात बदल घडवण्याचा प्रयत्न केल्याचे मोदी यांनी नमूद केले.
 
सरकारच्या विकासाच्या दृष्टिकोनाविषयी बोलताना मोदी म्हणाले की, जनहिताला प्राधान्य देणारे, सक्रिय आणि सुशासनावर आधारित धोरण राबवण्यावर भर देण्यात आला आहे. भारताचा संतुलित विकास साधणे, लहान शहरे आणि गावांमध्ये नव्या संधी निर्माण करणे, दुर्गम भागांना उत्तम संपर्क सुविधा उपलब्ध करून देणे आणि गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावणे हे विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या प्रक्रियेत आपण मागे राहणार नाही, असा विश्वास प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
देशातील पायाभूत सुविधांच्या विस्ताराचा उल्लेख करताना मोदी यांनी द्रुतगती मार्गांद्वारे लहान शहरांना जोडले जात असल्याचे सांगितले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसारख्या (एम्स) आरोग्य संस्थांचा विविध राज्यांमध्ये विस्तार होत असून, लहान शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, गावांमध्ये जवळपास दीड लाख आयुष्मान आरोग्य मंदिरे उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सकाळी वाराणसीतील नमो घाट येथे आयोजित ‘विंग्स ओव्हर द गंगा’ या हवाई प्रदर्शनालाही उपस्थिती लावली. भुवनेश्वरमधील आरबीआयच्या नव्या सुविधांचे उद्घाटन आणि वाराणसीतील हवाई प्रदर्शनातील सहभाग असा त्यांचा कार्यक्रम होता.