सप्तर्षी’ पुरस्कारांनी सात मान्यवरांचा गौरव

हिंदू रिसर्च फाउंडेशनतर्फे भव्य आयोजन

    दिनांक :25-Oct-2026
Total Views |

नागपूर,
saptarshi-awards-nagpur-2026भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरवशाली वारसा अधोरेखित करत साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यवरांना हिंदू रिसर्च फाउंडेशन, मुंबई-नागपूरतर्फे प्रतिष्ठेच्या ‘सप्तर्षी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी कविकुलगुरू कालिदास सभागृहात पाचव्या ‘सप्तर्षी’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
 
sap
 
‘रिव्हिजिटिंग द ग्लोरियस पास्ट ऑफ भारतवर्ष’ या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात प्रत्येक पुरस्कारार्थीला एक लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. जामनगर येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन रिसर्च सेंटरच्या डेटा अँड इनोव्हेशन विभागाच्या युनिट प्रमुख डॉ. गीता कृष्णन जी. पिल्लई यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
 
नवी दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, सुरत येथील जीवदया फाउंडेशनचे किशोरभाई शाह, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांच्यासह हिंदू रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. टी. एस. भाल, चेअरमन सुरेश कोते, भगवान राऊत आणि प्रीती रामकृष्णन मंचावर उपस्थित होते.
 
डॉ. टी. एस. भाल यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी भारतीय सर्व आयआयटीच्या नावांसोबत ऋषीची नावे जोडून भारतीय परंपरेचा सन्मान करावा, असे आवाहन केले. सोबतच, रेड क्रॉस सोसायटीच्या धर्तीवर रेड स्वस्तिक सोसायटीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता द्यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिता तिळवे व रिचा सुगंध यांनी केले.
 
 
सात मान्यवरांचा सन्मान
महर्षी वाल्मिकी पुरस्कार – पद्मश्री भालचंद्र वि. नेमाडे : प्रख्यात मराठी साहित्यिक, कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि विद्वान.
 
आर्यभट्ट पुरस्कार – पद्मश्री प्रा. व्ही. कामकोटी वीझिनाथन : प्रख्यात संगणकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि आयआयटी मद्रासचे संचालक.
 
नागार्जुन पुरस्कार – पद्मश्री प्रा. थलप्पिल प्रदीप : प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि आयआयटी मद्रासमधील प्राध्यापक.
 
विश्वकर्मा पुरस्कार – डॉ. अनिल रामजी सुतार : प्रख्यात वास्तुविशारद आणि शिल्पकार. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या निर्मितीतील योगदानासाठी प्रसिद्ध.
 
आचार्य भारद्वाज पुरस्कार – सुयश सिंह : गॅलेक्सआय स्पेस सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक.
 
आचार्य सुश्रुत पुरस्कार – डॉ. वेदप्रकाश मिश्रा : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे प्रो-चॅन्सेलर.
 
आचार्य कणाद पुरस्कार – प्रा. संजय जे. ढोबळे : भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक.
 
 
भूतकाळातील चांगले पुढे नेणे आवश्यक – भालचंद्र नेमाडे
भूतकाळाचे महत्त्व जाणल्यामुळेच जगात आपले स्थान निर्माण होते. भूतकाळ विसरल्यास वर्तमानकाळही बिघडू शकतो. त्यामुळे परंपरेतील चांगल्या गोष्टी पुढे नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र वि. नेमाडे यांनी केले.
भारताची साहित्यिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरा समृद्ध असून, ‘हिंदू’ शब्दाकडे संकुचित दृष्टिकोनातून पाहू नये, असे त्यांनी सांगितले. विविध धर्म, परंपरा आणि धर्मग्रंथांचा व्यापक स्वीकार केल्यास देश अधिक समृद्ध होईल, असेही ते म्हणाले. भारतीय साहित्याने जगाला नवे विचार दिले असून, या सर्वसमावेशक सांस्कृतिक परंपरेचा प्रसार फाउंडेशनने करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
भूतकाळ हा पाया असावा, अंतिम गंतव्य नव्हे – प्रा. थलप्पिल प्रदीप
भारतात केवळ वादविवाद झाले नाहीत, तर विचारांची देवाणघेवाणही सातत्याने होत राहिली. अनुत्तरित प्रश्न पुन्हा विचारण्याची आणि नव्याने शोध घेण्याची परंपरा आपण जपली पाहिजे. विचारांची विविधता हे आपले सामर्थ्य आहे. भूतकाळ हा आपला पाया असला पाहिजे, अंतिम गंतव्य नव्हे, असे प्रतिपादन प्रा. थलप्पिल प्रदीप यांनी केले.