मुंबई,
ST employees to receive a bonus दिवाळीच्या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण आनंदात जावा या उद्देशाने परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिवाळी बोनस आणि नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या घडीला एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या तब्बल ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा होणार असून सणापूर्वीच हातात पैसे आल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

सामान्यतः एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान केले जाते; मात्र यंदा दिवाळी सणाला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असल्याने वेतनाची तारीख आणि सण लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी सणासाठी कुटुंबीयांसह खरेदी करणे, घरगुती खर्च भागवणे आणि इतर नियोजनासाठी वेळेत पगार मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी महामंडळाच्या अर्थ-नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक अनुदान तसेच मागील महिन्यांतील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध करून घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी प्रशासनाने या प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून दिवाळीपूर्वीच पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल या दृष्टीने संपूर्ण नियोजन केले जात आहे.