नवी दिल्ली,
varanasi-air-show-modiउत्तर प्रदेशातील वाराणसी येथील प्रसिद्ध नमो घाटावर भारतीय वायुसेनेच्या 94 व्या स्थापना वर्षाच्या औचित्याने 'विंग्स ओव्हर गंगा' हा अभूतपूर्व आणि भव्य एयर शो आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात राफेल, सुखोई, मिराज-2000, मिग-29, जग्वार, अपाचे आणि चिनूक सारख्या अत्याधुनिक आणि बलाढ्य 100 विमानांनी काशीच्या आकाशात आपली ताकद दाखवून उपस्थितांचे डोळे दीपवून टाकले.
या भव्य आयोजनात सहभागी होण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये दाखल झाले. वाराणसीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो पार पडला. पोलीस लाईन्स ते चौकाघाट मार्गे नमो घाटाकडे जाणाऱ्या पीएम मोदींच्या ताफ्याचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकांचा उत्साह पाहून पंतप्रधान मोदी यांनी आपली गाडी थांबवून बाहेर येत उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले.
22 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या भव्य आयोजनात देशभरातील 12 एअरबेसवरून आलेल्या एकूण 100 विमानांनी भाग घेतला. यामध्ये 52 लढाऊ विमानं, 15 वाहतूक विमानं, 32 हेलिकॉप्टर्स आणि 01 हेरिटेज विमानाचा समावेश होता. चेन्नई आणि ग्वाल्हेरसह विविध एअरबेसवरून उडालेल्या या विमानांनी काशीच्या आकाशात चित्तथरारक कसरती सादर केल्या. सी-295, सी-17 आणि सी-130 सारख्या अजस्र वाहतूक विमानांनीही आपली ताकद दाखवून दिली.