नागपूर,
vidarbha-rain-alertबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असल्यामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उपसागरातील वादळामुळे बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने सरकत आहेत. परिणामी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
ऐन पीक काढणीच्या दिवसांत पावसाची शक्यता निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. मुख्यत: पावसासोबतच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. रविवारी नागपूरचे तापमान ३४.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कमाल व किमान तापमानात घट होत असल्यामुळे रात्री हलक्या गारव्यासह थंडी जाणवू लागली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीसाठी आणखी १५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी होत असल्याने दिवसा जाणवणारे उन्हाचे चटके कमी झाले आहेत.
‘एल निनो’मुळे अनेक प्रदेशांतील तापमान आणि पावसाचे नेहमीचे चक्र विस्कळीत झाले आहे. काही भागांत तीव्र दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे तर काही प्रदेशांत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते.