नवी दिल्ली,
Warning from External Affairs Minister S. Jaishankar संयुक्त राष्ट्रांच्या (UN) स्थापना दिनानिमित्त आयोजित 'चिन्मय अमृत महोत्सव ग्लोबल संमेलना'त बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जागतिक मुद्द्यांवर अत्यंत परखड भूमिका मांडली आहे. संयुक्त राष्ट्रांवर जोरदार निशाणा साधत त्यांनी स्पष्ट केले की, जागतिक संकटांचा सामना करताना संयुक्त राष्ट्राने खंबीर नेतृत्व दाखवले पाहिजे, केवळ मूकदर्शक बनून राहता कामा नये. दहशतवादाला जागतिक शांततेसाठी सर्वात मोठा धोका ठरवत त्यांनी दहशतवादाचा वापर शासकीय धोरण किंवा सत्ता चालवण्याचे हत्यार म्हणून करणाऱ्या देशांना चांगलाच चोप दिला. कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा वापर मुळीच स्वीकारार्ह नाही, त्याला कधीही योग्य ठरवता येणार नाही आणि त्यासाठी कोणतेही कारण देता येणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला. तसेच इतिहासातून धडा घेतल्यानंतरही काही देश दहशतवादाविरोधातील लढ्यात आपल्या राजकीय चाली आणि फायद्यांना प्राधान्य देत असल्याचे अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी राजकीय स्वार्थावरही ताशेरे ओढले.

विकसनशील देशांच्या आव्हानांवर प्रकाश टाकताना एस. जयशंकर यांनी सांगितले की, आज जगभरातील हा भाग '4F संकटा'शी झुंजत आहे, ज्यामध्ये फायनान्स (वित्त/पैसा), फ्युएल (इंधन), फूड (अन्न) आणि फर्टिलायझर (खते) यांचा समावेश आहे. या गंभीर समस्या सोडवण्यात विकसित देशांचाही तितकाच समान वाटा असून बाजाराच्या विकृत व संकुचित पद्धतींमुळे सामान्य जनतेचा त्रास अधिक वाढतो आहे, त्यामुळे यावर गंभीर व प्रामाणिक चर्चेची तातडीची गरज आहे. बहुपक्षीय संस्थांमध्ये तात्काळ सुधारणा करण्याची मागणी करताना जगातील मोठ्या घटकाला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवता येणार नाही आणि 'सुधारित बहुपक्षवादाची' ही मागणी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तंत्रज्ञानाचा उल्लेख करताना त्यांनी इशारा दिला की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) जग पूर्णपणे बदलू शकते, परंतु तिचा विकास आणि प्रभाव काही मोजक्याच लोकांच्या हाती सोडला जाऊ शकत नाही. भारत अशा 'मानव-केंद्रित आणि सर्वसमावेशक' दृष्टिकोनाचे समर्थन करतो जो संपूर्ण मानवतेच्या हिताचा असेल. आपल्या भाषणाच्या शेवटी परराष्ट्र मंत्र्यांनी यावर भर दिला की, प्रगती आणि समृद्धी एकमेकांशी जोडलेली आहे; जोपर्यंत मानवतेचा मोठा भाग मूलभूत गरजांपासून वंचित राहील, तोपर्यंत जगाची खरी प्रगती होऊ शकत नाही.