भीषण आग ७ ते ८ बस जळून खाक

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
भोपाळ
bhopal ISBT fire मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आंतरराज्यीय बसस्थानकाच्या (ISBT) परिसरात रविवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वर्मा ट्रॅव्हल्सच्या बसांना आगीने वेढल्याने एकच खळबळ उडाली. आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि आकाशात पसरलेल्या काळ्या धुरामुळे परिसरात घबराटनिर्माण झाली. या दुर्घटनेत सात ते आठ बस पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 

bhopal ISBT fire 8 buses gutted in massive blaze, losses estimated at rs 5 crore 
प्राथमिक माहितीनुसार, बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वर्मा ट्रॅव्हल्सच्या एका बसला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने शेजारी उभ्या असलेल्या इतर बसांनाही आपल्या कवेत घेतले. आगीची तीव्रता वाढत गेल्याने घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर सुमारे १५ ते २० मिनिटांत मदतकार्य सुरू झाले. अग्निशमन दलाच्या १५ ते २० गाड्यांनी पाण्याचा मारा करत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
बस रिकाम्या असल्याने मोठी दुर्घटना टळली
आगीची भीषणता लक्षात घेता मोठ्या bhopal ISBT fire  जीवितहानीची शक्यता होती. मात्र, दुर्घटनेच्या वेळी सर्व बस पार्किंगमध्ये रिकाम्या उभ्या होत्या. त्यामध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. जळालेल्या बस बालाघाट, सिवनी आणि इंदूर या मार्गांवर धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.घटनास्थळाच्या जवळच तेलाने भरलेले प्लास्टिकचे ड्रम आणि एक टँकर ठेवण्यात आले होते. आगीच्या ज्वाळा या ड्रमपर्यंत पोहोचल्या असत्या, तर मोठा स्फोट होऊन बसस्थानक परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली असती. त्यामुळे आग या भागापर्यंत पसरण्यापूर्वीच ती नियंत्रणात आणणे महत्त्वाचे ठरले.या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्तरावर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्युत बिघाडामुळे आग लागली की अन्य कोणाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, याचा पोलीस आणि प्रशासनाकडून तपास सुरू आहे.या दुर्घटनेमुळे बसस्थानकांमधील अग्निसुरक्षा व्यवस्था, पार्किंग परिसरातील ज्वलनशील पदार्थांची साठवण आणि आपत्कालीन उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचे अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.