नवी दिल्ली
delhi building collapse दिल्लीतील हर्ष विहार परिसरात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी उशिरा ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि दिल्ली अग्निशमन दलाने रात्रभर बचावकार्य राबवले. सुमारे १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून इमारत कोसळण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त संदीप लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ही जुनी एकमजली इमारत होती आणि तिच्यावर आणखी एक मजला बांधण्याचे काम सुरू होते. परिसर चारही बाजूंनी इमारतींनी वेढलेला असल्याने नेमकी कोणती इमारत कोसळली, हे सुरुवातीला निश्चित करण्यात अडचणी आल्या. बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक, स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. ढिगारा हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली. एनडीआरएफने श्वानपथक आणि आवश्यक साधनसामग्रीच्या मदतीने शोधमोहीम राबवली.
दुर्घटनेनंतर दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा आणि आशीष सूद यांनीही उत्तर-पूर्व दिल्लीतील हर्ष विहार येथील मिलन गार्डन परिसराला भेट दिली. कपिल मिश्रा यांनी सांगितले की, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके बचावकार्यात सहभागी झाली होती. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवर नव्याने छताचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना तो कोसळला आणि त्याच्या वजनामुळे खालचा मजलाही ढासळला. या दुर्घटनेत पिता आणि पुत्र ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील सीमापुरी, सीलमपूर, मुस्तफाबाद आणि बाबरपूर परिसरांत यापूर्वी घडलेल्या इमारत कोसळण्याच्या घटनांचा उल्लेख करत कपिल मिश्रा यांनी बेकायदा बांधकामांबाबत चिंता व्यक्त केली. अशा दुर्घटनांमागे नियमांचे उल्लंघन करून केलेले बांधकाम कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.
मंत्री आशीष सूद delhi building collapse यांनी दुर्घटनेतील पीडित कुटुंबांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगितले. बचाव आणि मदतकार्यांसाठी सर्व संबंधित यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात महापालिका किंवा दिल्ली सरकारमधील कोणाचीही जबाबदारी निष्पन्न झाली, तरी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेला निर्देश देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये इमारती कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. ७ ऑक्टोबर रोजी सीमापुरी येथे इमारत कोसळून गर्भवती महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण जखमी झाले होते. त्यापूर्वी सत्य निकेतन परिसरात पाचमजली इमारत कोसळून सात जणांना जीव गमवावा लागला होता. दक्षिण दिल्लीतील साकेत परिसरात ३० मे रोजी कोचिंग सेंटर, कॅफे आणि कार्यालये असलेली बहुमजली व्यावसायिक इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बांधकाम नियमांची अंमलबजावणी आणि बेकायदा बांधकामांवरील कारवाईबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.