अरे देवा... प्रेम पैसा फसवणूक २० महिला पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले

    दिनांक :26-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
delhi police constable cheating case लग्नाचे आश्वासन, स्वतःला मोठा व्यावसायिक असल्याचे भासवणे आणि आलिशान जीवनशैलीचा दिखावा करून महिलांना जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे. विक्रांत तोमर या तरुणावर दिल्ली पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबलची लग्नाचे आमिष दाखवून आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत सुमारे २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला बुराडी येथून अटक केली आहे. तो उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी आहे. तपासादरम्यान दिल्ली पोलीस दलातील एकाच तुकडीतील सुमारे २० महिला कॉन्स्टेबल त्याच्या संपर्कात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या सर्व महिलांची फसवणूक झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 

delhi police constable cheating case man accused of duping woman of rs 24 lakh with marriage promise 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार शिवानी या करोलबाग पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. विक्रांतने इन्स्टाग्रामवरून त्यांच्याशी संपर्क साधला. दिल्ली पोलिसांत क्रीडा कोट्यातून भरती होण्यासंदर्भात माहिती विचारण्याच्या निमित्ताने दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू त्यांच्यातील ओळख वाढली. विक्रांतने स्वतःला मोठा व्यावसायिक असल्याचे सांगितले, तसेच क्रिकेट क्षेत्राशी संबंधित असल्याचाही दावा केला. त्याच्या बोलण्यावर आणि राहणीमानावर विश्वास ठेवून शिवानी यांना तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वाटले. त्यानंतर त्याने त्यांच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात केली.
 
 

२४ लाख रुपये उकळल्याचा आरोप
 
 
पोलिसांच्या तपासानुसार, गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल, असे सांगून विक्रांतने शिवानी यांचा विश्वास संपादन केला. त्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांनी सुरुवातीला स्वतःची बचत गुंतवली. त्यानंतर १२ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनही पैसे उधार घेतले. अशा प्रकारे सुमारे २४ लाख रुपये विक्रांतला दिल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान सुमारे आठ लाख रुपयांच्या एका व्यवहाराचीही माहिती समोर आली आहे. विक्रांतच्या सांगण्यावरून ही रक्कम 1x.com या सट्टेबाजीच्या मंचाशी संबंधित बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या पैशांचा व्यवहार नेमक्या कोणत्या खात्यांतून झाला आणि त्यांचा पुढे कसा वापर करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.
भाड्याच्या आलिशान गाड्यांतून श्रीमंतीचा देखावा
विक्रांत महिलांचा विश्वास कसा संपादन करत होता, याचाही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो महागड्या आलिशान गाड्यांचा वापर करत असे. मात्र, या गाड्या त्याच्या मालकीच्या नसून काही तासांसाठी भाड्याने घेतल्या जात असल्याचा आरोप आहे. या गाड्यांमधून तो महिलांना फिरायला नेत असे. सोशल मीडियावरही आलिशान गाड्या आणि ऐषआरामी जीवनशैली दर्शवणारी छायाचित्रे व व्हिडिओ प्रसिद्ध केले जात होते.
या दिखाव्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचा समज निर्माण होऊन महिलांचा त्याच्यावर विश्वास बसत असावा, असा पोलिसांचा संशय आहे. एकाच गाडीचा वापर वेगवेगळ्या महिलांना प्रभावित करण्यासाठी केला जात होता का, तसेच एका महिलेकडून मिळालेल्या पैशांचा वापर दुसऱ्या महिलेसमोर श्रीमंतीचा आभास निर्माण करण्यासाठी झाला का, याचाही तपास केला जात आहे.
दिल्ली पोलीस दलातील २० महिला कॉन्स्टेबल संपर्कात?
तपासादरम्यान विक्रांतच्या संपर्कात दिल्ली पोलीस दलातील एकाच तुकडीतील सुमारे २० महिला कॉन्स्टेबल आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याने आणखी महिलांना लक्ष्य केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, या सर्व महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याची पुष्टी झालेली नाही. काही महिलांनी अद्याप अधिकृत तक्रारीही दाखल केलेल्या नाहीत.विक्रांतची लिव्ह-इन पार्टनरदेखील दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. तिच्या माध्यमातून त्याला इतर महिला कॉन्स्टेबलची माहिती मिळत होती का, या शक्यतेचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, याचीही माहिती पोलीस गोळा करत आहेत.
आरोपीविरोधात यापूर्वीही पाच गुन्हे
पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रांत तोमरविरोधात दिल्लीमध्ये फसवणुकीचे यापूर्वीच पाच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मायापुरी, हरिनगर आणि इंद्रपुरी पोलीस ठाण्यांतील प्रकरणांचा समावेश आहे. पूर्व जिल्हा सायबर पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच वर्षी जून महिन्यात तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.सध्या मध्य जिल्हा सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीच्या बँक खात्यांची माहिती, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया खात्यांची छाननी केली जात आहे. त्याने किती महिलांकडून पैसे घेतले, एकूण किती रकमेची फसवणूक झाली आणि या प्रकरणात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.विक्रांतला अटक करण्यात आली असली, तरी त्याच्यावरील आरोपांची चौकशी अद्याप सुरू आहे. सुमारे २० महिला कॉन्स्टेबलना लक्ष्य केल्याचा संशय असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाची व्याप्ती आणि आर्थिक फसवणुकीची एकूण रक्कम स्पष्ट होणार आहे.