नागपूर,
Double honor for Shrikant Agarkar विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे पं. बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर येथील शिक्षक श्रीकांत नानासाहेब आगरकर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. यासोबतच औदुंबर बहुउद्देशीय शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे त्यांना ‘गुरुरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. शिष्यवृत्ती आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन, गणित विषयाचे अध्यापन, विज्ञानातील प्रयोग, क्षेत्रभेटी, औद्योगिक भेटी आणि निवडणूक प्रक्रियेची प्रात्यक्षिके अशा विविध उपक्रमांतून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तंत्रज्ञानाचा शैक्षणिक वापर करून अध्यापन अधिक प्रभावी करण्यासोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

अध्यापनासोबतच पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठीही आगरकर यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकास न करता त्यांच्यात कौशल्ये, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित व्हावी, हा त्यांच्या कार्यामागील उद्देश आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत मिळालेल्या या दुहेरी सन्मानाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. पुरस्कार हा कार्याचा शेवट नसून अधिक चांगले काम करण्याची नवी सुरुवात आहे, अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षण अधिक आनंददायी व कृतीशील करण्यासाठी यापुढेही कार्यरत राहण्याचा संकल्प श्रीकांत आगरकर यांनी व्यक्त केला.