मुंबई
mrunal jadhav ‘दृश्यम’ हा चित्रपट आठवला की विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाभोवती घडणाऱ्या थरारक घटनांची आठवण होते. अजय देवगणने विजय साळगावकरची भूमिका साकारली होती, तर बालकलाकार मृणाल जाधवने त्याची मुलगी अनु साकारली होती. चित्रपटातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना अस्वस्थ करणारे होते. त्यात पोलिस ठाण्यातील चौकशीचा प्रसंग विशेष गाजला. या दृश्यातील मृणालच्या अभिनयाचेही मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते. मात्र, हा सीन चित्रित करताना मृणाल स्वतः प्रचंड घाबरली होती, असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला.
मृणालने या प्रसंगाच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगितला. चित्रपटात इन्स्पेक्टर गायतोंडे साळगावकर कुटुंबाला मारहाण करतो आणि अनुच्या दिशेनेही धावतो, असा हा प्रसंग होता. त्यावेळी मृणाल खूप लहान होती. पडद्यावर दाखवली जाणारी मारहाण प्रत्यक्षातही होत आहे की काय, असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला होता. त्यामुळे ती आणखी घाबरली आणि सेटवरील वातावरणामुळे तिला रडूही कोसळले.
मृणालच्या भीतीची जाणीव झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी तिला बाजूला घेऊन समजावले. या प्रसंगातील भावना समजून घेण्यासाठी त्यांनी तिला तिच्या खऱ्या आई-वडिलांना कोणी मारहाण केली असती, तर तिला काय वाटले असते, याची कल्पना करण्यास सांगितले. त्या भावनेचा विचार करून अभिनय करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मुलाखतीत मृणालने हा अनुभव सांगितला.
‘दृश्यम’मधील अनुच्या भूमिकेमुळे मृणाल जाधव घराघरांत पोहोचली. विशेष म्हणजे, तिने यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मात्र, त्या भूमिकेसाठी तिची निवड झाली नाही. त्यानंतर तिला ‘दृश्यम’मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि अनुच्या भूमिकेने तिच्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली.