नवी दिल्ली,
Elections in Jamia University दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात तब्बल दोन दशकांनंतर विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केला. विद्यार्थी संघाच्या संविधानाला मंजुरी मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत निवडणुका घेण्यात येतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निवडून आलेला विद्यार्थी संघ पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अनेक दिवस आंदोलन केले होते. विद्यापीठ प्रशासनाने २००६ मध्ये विद्यार्थी संघ बरखास्त केला होता. त्यानंतर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव मोहम्मद महताब आलम रिझवी यांनी जारी केलेल्या आदेशात आंदोलनाच्या काळात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सादर केलेल्या मागण्यांचा विचार केल्यानंतर प्रशासनाने हे निर्णय घेतले. दरम्यान, आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनाविरोधात करण्यात आलेली कथित बदनामीकारक वक्तव्ये, केलेल्या कृती आणि सोशल मीडियावरील पोस्ट यांसंदर्भात सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास आंदोलक विद्यार्थी तयार झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी पत्रकार परिषदेत माफी मागण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जामिया मिलिया इस्लामियातील एनएसयूआयच्या (NSUI) विद्यार्थी शाखेने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माफी मागितली आहे. प्रशासनाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा करणे चुकीचे ठरल्याचे संघटनेने म्हटले आहे. मात्र, आपल्या तीनही मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिकाही संघटनेने स्पष्ट केली. आता विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाच्या निवडणुकांना मान्यता दिल्यामुळे आंदोलन संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर पुढे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.